Join us  

Rishabh Pant Health Updates: कर्णधार रोहित शर्माची डॉक्टरांसोबत चर्चा; रिषभ पंतच्या तब्येतीची केली विचारपूस 

Rohit Sharma Rishabh Pant: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये असून तेथून त्याने रिषभ पंतच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 11:09 AM

Open in App

नवी दिल्ली : कार अपघातात जखमी झालेला भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतच्या दुखापतीत बरीच सुधारणा झाली आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) दिल्लीचे अधिकारीही शनिवारी मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी पंतची भेट घेतल्यानंतर सांगितले की, पाच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पंतवर उपचार करत आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुट्टीसाठी मालदीवमध्ये असून तिथून तो डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे.

माहितीनुसार, रोहित सतत फोनवर त्याच्या सहकाऱ्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, रोहितने ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमशी संवाद साधला. खरं  तर रोहितने मालदीवमध्ये कुटुंबासह नवीन वर्षाचे स्वागत केले. पंतवर उपचार करणाऱ्या टीममध्ये सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जनसह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णालय व्यवस्थापन थेट कुटुंबीयांशी आणि बीसीसीआयला उपचाराबाबत माहिती देत ​​आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभने त्यांना सांगितले की, "झोपेमुळे नव्हे तर खड्ड्यातून वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचे नियंत्रण सुटले आणि उलटली."

एअरलिफ्टची गरज नाहीबीसीसीआयचे तीन सदस्यीय पथक शनिवारी देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यामध्ये कायदेशीर सल्लागाराचाही समावेश आहे. पंतचे डोके आणि मणक्याचे स्कॅन करण्यात आले असून रिपोर्ट सामान्य आहेत. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्याच्या डोक्याला आणि पाठीवरही किरकोळ जखमा आहेत. रिषभच्या कपाळावरची प्लास्टिक सर्जरी झाल्याचीही माहिती कौटुंबिक सूत्रांकडून मिळाली. लक्षणीय बाब म्हणजे एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. बाहेरची जखम लवकरच बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. लिगामेंट रिकव्हरीसाठी त्याला कोठे नेणे योग्य आहे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याच्यासोबत त्याची बहीण साक्षी पंत, आई सरोज पंत आणि क्रिकेटर नितीश राणा हे देखील रुग्णालयात आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :रिषभ पंतरोहित शर्माअपघातभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App