मेलबोर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडू तसेच सहयोगी स्टाफचा नवीन कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बीसीसीआयने सोमवारी दिली. दरम्यान, भारतीय संघ ७ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी एका विशेष विमानाने मेलबोर्नहून सिडनीत दाखल झाला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,‘भारतीय खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील सदस्यांची तीन जानेवारी रोजी कोरोना आरटी- पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उपकर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ या पाच खेळाडूंचा स्थानिक हॉटेलमध्ये जेवण घेत असल्याचा व्हीडिओ पुढे आल्यानंतर सर्वांना विलगीकरणात पाठविण्यात आले होते. हे जैव सुरक्षेचे उल्लंघन आहे काय, हे तपासण्यासाठी सीए आणि बीसीसीआयने या प्रकरणाराचा तपास करण्याचे ठरवले होते. या सर्वांचा अहवालदेखील निगेटिव्ह येताच पाचही खेळाडूंना सराव करण्यास आणि सिडनीकडे संघासोबत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.’ भारतीय संघ या वादामुळे निराश असून, सीएने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्यावरही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भारतीय संघाने विलगीकरणाच्या नियमांवर नाराजी व्यक्त केल्याने १५ जानेवारीपासून सुरू होणारी ब्रिस्बेन येथील चौथी कसोटी धोक्यात असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले होते.
माध्यमांनी काय म्हटले, हा खेळाडूंचा काळजीचा विषय नाही. आम्ही तिसऱ्या कसोटीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. कारण मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. खेळाडूंनी बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा बायो बबल प्रोटोकॉल नियम तोडला नाही, हेच आम्ही समजतोय, असे संघ व्यवस्थापनातील सुत्रांनी सांगितले. तिसऱ्या कसोटीनंतर आम्हाला मालिकेतील चित्र २-१ असे पाहायचे असल्याचे ते म्हणाले.
सिडनीत केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगीn सिडनी : येथील एससीजी क्रिकेट मैदानावर ७ जानेवारीपासून होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी जवळपास ९५०० प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, सिडनीमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला एससीजी मैदानाची क्षमता ५० टक्क्यांवरून २५ टक्के घटवण्याची सूचना केली आहे. न्यू साऊथ वेल्स सरकारच्या सल्ल्यानंतर ही सूचना करण्यात आली होती.n दरम्यान, तिसरा कसोटी सामना सिडनीहून मेलबोर्नला हलविण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरू होता. मात्र, अखेर सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच हा सामना खेळविण्याचे निश्चित करण्यात आले.n क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी सीईओ निक हॉकले म्हणाले, ‘कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे व्यवस्थित पालन केले जावे, यासाठी एससीजीची क्षमता घटविणे गरजेचे होते. तिकीट विकत घेतलेल्या प्रेक्षकांनी संयम दाखवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या प्रेक्षकांचे पैसे आम्ही परत करणार आहोत. त्यानंतर एससीजीची बैठक व्यवस्था निश्चित करुन पुन्हा तिकीट विक्री केली जाईल.’ याआधी भारताने येथे यजमान संघाविरुद्ध दोन वन डे आणि एक टी-२० असे तीन सामने १८ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळले. ८ डिसेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्याला मात्र ३० हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती.