Join us  

Rahul Dravid Shikhar Dhawan Indian Team for SA: राहुल द्रविडच्या निर्णयामुळे शिखर धवनचे ट्वेंटी-२० करियर संपुष्टात; जाणून घ्या प्रकरण

Indian Team for SA:  ९ जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:08 PM

Open in App

Indian Team for SA:  ९ जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत आफ्रिकेचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) यांचे पदार्पण झाले आहे. राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन व शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांची निवड न झाल्याचे क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. त्यात शिखरला ट्वेंटी-२०त न घेण्याचा निर्णय हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा होता, असे वृत्त समोर आले आहे.

Inside.Sports ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयची रविवारी बैठक पार पडली, त्यात राहुल द्रविड, निवड समितीचे सदस्य आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात होतकरू खेळाडूंवर चर्चा करण्यात आली. यावेळी राहुल द्रविडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन संघाने युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी असे, BCCI चे सचिव जय शाह यांना सांगितले. त्यानुसार शिखऱ धवनला न निवडण्याचा निर्णय हा राहुल द्रविडने घेतला, निवड समतीने नाही. द्रविडने स्वतः धवनला याबाबत सांगितले. 

''दशकाहून अधिक काळ शिखर धवनने भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे, परंतु ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी  करणाऱ्या युवकांना संधी देण्याची गरज आहे. राहुल द्रविडने हा निर्णय घेतला आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. रविवारी संघ जाहीर करण्यापूर्वी द्रविडने स्वतः धवनला हा निर्णय सांगितला,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने  InsideSport.IN ला सांगितले. वय हे धवनच्या आडवे आले, परंतु त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघात कमबॅक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयपीएलमध्ये त्याने  सलग सात पर्वांत ४००+ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२मध्ये त्याने १४  सामन्यांत ४६० धावा करून पंजाब किंग्सकडून सर्वधिक धावा करणारा फलंदाज आहे.  

२०२१चा श्रीलंका दौरा ही त्याची अखेरची ट्वेंटी-२० मालिका ठरली आहे. बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाला,'' तुमच्याकडे ऋतुराज, इशान, लोकेश व संजू असे टॉप ऑर्डरला फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. राहुलला नेमकं काय हवंय, हे माहित्येय. आम्ही सर्व धवनचा आदर करतो आणि त्यामुळेच द्रविडने स्वतः त्याला कॉल करण्याचा निर्णय घेतला, की यापुढे ट्वेंटी-२० संघात तुझा विचार केला जाणार नाही.'' याआधी द्रविडने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वृद्घीमान साहाबद्दल असा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनराहुल द्रविडबीसीसीआय
Open in App