नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या सलग आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. अलीकडेच भारतीय संघाने वेस्टइंडिजला त्यांच्याच धरतीवर एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप केले आहे. तर आता रोहितच्या नेतृत्वात टी-२० संघ वेस्टइंडिजविरूद्ध मालिका खेळत आहे. याच दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI)शनिवारी झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, जिथे ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. तर कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट पासून टी-२० आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. यासाठी संघाची नावे पाठवण्याची मुदत ८ ऑगस्टपर्यंत आहे. विशेष म्हणजे आशिया चषकासाठी निवडण्यात आलेला संघच टी-२० विश्वचषकात असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच पुढील आठवड्यात विश्वचषकाचा संघ काय असेल हे स्पष्ट होईल. हा संघ आशिया चषकाचे ५ सामने, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ६ टी-२० सामन्यांसाठी मैदानात असणार आहे. म्हणजेच विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एकूण १० टी-२० सामने खेळणार आहे.
के.एल राहुलचे होणार पुनरागमनटी-२० आशिया चषकासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि के.एल राहुल यांचे पुनरागमन निश्चित असल्याचे बोलले जात आहे. हे तिन्ही दिग्गज वेस्टइंडिजविरूद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर आहेत. तर आशिया चषकाचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
झिम्बाब्वेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघशिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाटी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.