नवी दिल्ली : आशिया चषक 2022 चा थरार संपला असून सर्वच संघ टी-20 विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पार पडणाऱ्या विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. आतापर्यंत यजमान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाची देखील विश्वचषकासाठी आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आज होणाऱ्या संघ व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर विश्वचषकातील संघ समोर येईल, त्यामुळे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष बीसीसीआयच्या निर्णयाकडे लागले आहे. आज नक्की कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे पाहण्याजोगे असेल.
दरम्यान, संघ जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले असताना अनेक आजी माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. आशिया चषकात भारतीय संघांने सर्वांना निराश केले. स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेने विजय मिळवून सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला. आशिया चषकात भारतीय संघाची गोलंदाजी फारच निराशाजनक ठरली. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक बळी पटकावले मात्र त्याला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये बळी पटकावता आले नव्हते. त्यामुळे भारतीय गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता आहे.
उमरान मलिकला मिळणार संधी? भारतीय संघाचा माजी स्टार फिरकीपटू हभजन सिंगने ट्विट करून गोलंदाजीत बदल होण्याचे संकेत दिले आहे. आज जाहीर होणाऱ्या विश्वचषक संघात मिस्टर 150 उमरान मलिकला कोणाला पाहायचे आहे?, असा प्रश्न विचारून हरभजनने गोलंदाजीत बदल होण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियातील त्या उसळत्या खेळपट्ट्यांवर मलिक हा भारताचे ट्रम्प कार्ड असू शकते यावर काय विचार आहे?, असे विचारून सस्पेन्स कायम ठेवला आहे.
बुमराह-मलिकची जोडी एकत्र दिसणार? आशिया चषक 2022 स्पर्धेत भारताला सुपर-4 मध्येच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून रोहित शर्मा अँड टीमला हार मानावी लागली आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. आशिया चषकात भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, हेही तितकेच खरे आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल या जलदगती गोलंदाजी उणीव प्रकर्षाने जाणवली. के.एल राहुलला दणक्यात ओपनिंग करून देता आलेली नाही. विशेष बाब अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात बुमराह-मलिकची जोडी एकत्र दिसणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.