भारतीय संघाचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. प्रज्ञान ओझाने 2008 साली भारतीय वन- डे संघात पदार्पण केले होते. त्यानंतर प्रज्ञान ओझाने तिनही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2013 साली प्रज्ञान ओझा भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
प्रज्ञान ओझाने कसोटी क्रिकेटमध्ये 24 सामन्यात 113 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 18 वन- डे सामन्यात प्रज्ञान ओझाला 21 विकेट्स घेण्यास यश मिळाले असून 6 ट्वेंटी- 20 सामन्यात प्रज्ञानने 10 विकेट्स पटकावल्या होत्या. विशेष म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटविश्वातील शेवटच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात प्रज्ञान ओझाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रज्ञान ओझाने एकूण 108 सामने खेळले असून यामध्ये त्याने 424 विकेट्स घेतल्या आहेत. ओझाची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 7/58 अशी आहे. तसेच प्रज्ञानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2005 साली हैहराबाद संघामधून पदार्पण केले होते, तर प्रथम श्रेणीमधील अंतिम सामना बिहारच्या संघाकडून नोव्हेंबर 2018मध्ये खेळला होता.