Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय शिलेदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात टीम इंडियानं सोनेरी कामगिरी केली. मोदींनी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय मैदानावर सुवर्ण विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान, भारतीय शिलेदारांनी मोदींना एक खास भेट दिली. चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतानं विक्रमी १०७ पदकं जिंकली. यामध्ये २८ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानला पराभूत करून भारतीय क्रिकेट संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या यशानंतर भारतीय संघानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वाक्षरी केलेली बॅट भेट दिली.
यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय खेळाडूंची मेहनत आणि त्यांनी मिळवलेल्या यशामुळं तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. आपल्या 'नारी शक्ती'नं आशियाई स्पर्धेत केलेली कामगिरी पाहून मला अभिमान वाटतो. भारतीय मुलींची काय ताकद आहे हे यातून दिसून आलं. खरं तर इतिहासात पहिल्यांदाच भारताला आशियाई स्पर्धेत १०० पदकांचा टप्पा ओलांडता आला. याआधी २०१८ मध्ये भारताने सर्वाधिक ७० पदकं जिंकली होती.
भारताची 'गोल्डन' कामगिरीऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारतीय संघानं अफगाणिस्तानविरूद्ध विजय मिळवत सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला. भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकाच्या लढाईत भारतानं बाजी मारली. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर भारताला विजयी घोषित करण्यात आलं. तुलनेनं अफगाणिस्तानपेक्षा चांगली आंतरराष्ट्रीय रँकिंग असल्यामुळे भारतानं सुवर्ण पदक मिळवलं. भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील आशियाई स्पर्धेत सुवर्ण पटकावले. भारताच्या सोनेरी कामगिरीनंतर अफगाणिस्तानला रौप्य तर बांगलादेशलला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.