त्रिनिदाद : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ विंडीजला क्लिन स्वीप देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेस्टइंडिजचा संघ आज आपल्या अस्तित्वासाठी मैदानात उतरेल कारण भारताने २ सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल.
भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवून वेस्टइंडिजच्या धरतीवर इतिहास रचण्याची संधी असेल. कारण भारतीय संघाने आतापर्यंत एकदाही विंडीजला त्यांच्या धरतीवर एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप केले नाही. यापूर्वी कोणत्याच भारतीय कर्णधाराला हा कारनामा करण्यात यश आले नाही त्यामुळे शिखर धवनला आपल्या नेतृत्वात इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघ रचणार इतिहास?यापूर्वी भारतीय संघाने वेस्टइंडिजच्या भूमीवर ९ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, ज्यातील चार मालिका वेस्टइंडिजने तर पाच मालिका भारताने जिंकल्या आहेत. भारतीय संघाने २०१७ मध्ये ३-१ ने मालिका जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतीय संघाने तब्बल ३९ वर्षांपूर्वी आपली पहिली मालिका विंडीजच्या धरतीवर खेळली होती.
वेस्टइंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिका
१९८३ वेस्टइंडिज २-१ ने विजयी१९८८-८९ वेस्टइंडिज ५-० ने विजयी१९९६-९७ वेस्टइंडिज ३-१ ने विजयी२००२ भारत २-१ ने विजयी२००६ वेस्टइंडिज ४-१ ने विजयी२००९ भारत २-१ ने विजयी२०११ भारत ३-२ ने विजयी२०१७ भारत ३-१ ने विजयी२०१९ भारत २-० ने विजयी२०२२ भारत २-० ने आघाडीवर
वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघशिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्ड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.