नवी दिल्ली ।
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना आपल्या नावावर केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवून मालिकेवर कब्जा मिळवण्याचे भारतासमोर आव्हान असेल. १४ जुलै रोजी म्हणजेच आज मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर भारताच्या नावावर एका नव्या विक्रमांची नोंद होईल. कारण भारतीय संघ विजयाचे शतक ठोकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
दरम्यान, विजयाचे शतक पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला इंग्लंडविरूद्ध राहिलेल्या २ सामन्यातील एका सामन्यात विजय मिळवावा लागेल. भारताकडे इंग्लंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० वा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडला ५६ सामन्यांमध्ये पराभूत केले आहे, तर कसोटीमध्ये इंग्लिश संघाला ३१ सामन्यांमध्ये चितपट केलं आहे. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने इंग्लंडविरूद्ध २२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भारताने इंग्लंडविरूद्ध एकूण ९९ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाला सुवर्णसंधी
तर इंग्लंडचा संघ भारताविरूद्ध ५० कसोटी, ४३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने जिंकला आहे. इंग्लंडने भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयाचे शतक पूर्ण केले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला विजयाचे शतक ठोकून त्यांच्याच भूमीवर त्यांना चितपट करण्याची संधी असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी भारताकडे २ संधी असणार आहेत, कारण इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील आणखी २ सामने उरले आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाचा दारूण पराभव केला होता.
Web Title: Indian team has a golden chance to score a winning century by winning today's match against england
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.