केपटाऊन : आयसीसी चषकाचा गेल्या अनेक वर्षांचा दुष्काळ संपविण्याच्या तयारीत असलेला वरिष्ठ भारतीय महिला संघ आज पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. महिलांच्या क्रिकेटमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारतीय संघाची बाजू नेहमीच वरचढ ठरलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून टी-२० विश्वचषकाची दणक्यात सुरुवात करण्याचा भारतीय महिला संघाचा मानस असेल. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाने भारतावर विजय मिळवला होता. त्यावेळी आधीच अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय संघाने या सामन्यात अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली होती. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या दोन्ही संघांच्या दर्जामध्ये बरीच तफावत बघायला मिळते आहे. एकीकडे भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वर्चस्वाला झुगारण्याचा प्रयत्न करतो आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी महिला क्रिकेट रसातळाला गेले आहे. महिलांच्या पहिल्या आयपीएलसाठी होणाऱ्या ऑक्शनच्या एक दिवस आधीच हा सामना होत असलेल्या अनेक खेळाडूंचा फ्रँचाइझींना आपल्या कामगिरीद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर स्मृती मानधना यांच्या फिटनेसवर अजून संभ्रम आहे. हरमनप्रीत खांद्याच्या तर मानधना बोटांच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानधना आणि हरमनप्रीतसंदर्भात कुठलीही जोखीम उचलण्याच्या संघव्यवस्थापन विचारात नाही. टी-२० विश्वचषकाचा हा पहिलाच सामना असल्याने या दोघींनी विश्रांती जरी घेतली तरी फारसा फरक पडणार नाही.
रेणुका सिंग वगळता इतर गोलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे. अनुभवी शिखा पांडेने मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले खरे, मात्र तिला अद्याप एकही बळी घेता आलेला नाही. फिरकीपटूंचीही लौकिकाला साजेशी कामगिरी होताना दिसत नाही. फलंदाजीत जेमिमा, शेफाली वर्मा, अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांच्याकडून भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत. पाकिस्तानची भिस्त निदावर आहे. सराव सामन्यात त्यांनी बांगलादेशाचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघही टी-२० विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल.
Web Title: Indian team has a tough match against Pakistan today match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.