मुंबई : भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता भारतीय संघाला वेध लागले आहेत ते ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे. ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमीच भारतासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. पण या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताला जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. पण हे सांगताना ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी खेळाडू नाहीत, हेदेखील सचिनने स्पष्ट केले आहे.
सचिन दोनशे कसोटी सामने खेळला, यापैकी २० सामने तो ऑस्ट्रेलियामध्ये खेळला आहे. या २० सामन्यांमध्ये ५३.२०च्या सरासरीने १८०९ धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतकांचा समावेश आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यांमध्ये भारताला फक्त पाच सामनेच जिंकता आलेले आहेत. भारताला ७० आणि ८० च्या दशकामध्ये फक्त दोन सामने जिंकता आले होते. त्यानंतर १९८१ ते २००३ या कालावधीमध्ये भारताला एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर २००३ आणि २००८ साली भारताला कसोटी सामना जिंकता आला होता. पण गेल्या आठ वर्षांमध्ये भारताला एकच कसोटी सामना जिंकता आला आहे. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ पाहता भारताला मालिका विजय मिळवण्याची ही नामी संधी असेल.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबाबत सचिन म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाचे यापूर्वीचे आणि आताचा संघ पाहिला. त्यांची तुलना केली तर एक गोष्ट जाणवते. यापूर्वीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये अनुभवी खेळाडू होते. पण सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात जास्त अनुभव असलेला खेळाडू नाहीत. त्यामुळेच भारताला या दौऱ्यात सामने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. "