नवी दिल्ली : भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून 2-0 ने मालिकेवर कब्जा केला आहे. आज अखेरच्या दिवशी यजमान बांगलादेशच्या संघाने शानदार पुनरागमन करून भारताची धाकधुक वाढवली होती. मात्र, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार खेळी करून यजमानांना पराभवाची धूळ चारली. श्रेयस अय्यर (29) आणि रविचंद्रन अश्विन (42) यांनी नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आजच्या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे कूच केली आहे.
दरम्यान, बांगलादेशविरूद्धच्या विजयामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मार्ग सोपा झाला आहे. खरं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्त्वाची होती. या मालिकेपूर्वी 55.77 गुणांसह भारत WTC पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आजच्या विजयामुळे भारताने 58.93 गुण मिळवले असून आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे.
मात्र, भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3 सामन्यांची मालिका खेळायची आहे. जर तरच्या समीकरणामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. आताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. भारत दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी स्थित आहे.
असे आहे समीकरण
- जर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने हरवले तर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध फक्त कोणत्याही फरकाने विजय मिळवावा लागेल.
- जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक जरी सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 2-0 ने विजय मिळवला तर, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1, 3-0 किंवा 2-2 ने जिंकणे आवश्यक आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारताने आजचा सामना गमावला असता तर संघाला कोणत्याही परिस्थितीत उरलेले चारही सामने जिंकावे लागले असते. मात्र आजच्या विजयाने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग सोपा झाला आहे. आता भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर त्यांचे गुण 62.5 होतील आणि टीम इंडिया सहजपणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"