सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. लीग टप्प्यातील सामने 1 ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जात आहेत, ज्यामध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघाचा 15 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.
दरम्यान, स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्याच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाने सर्वाधिक 6वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. भारताने स्पर्धेतील आपले सलामीचे तिन्ही सामने जिंकून एकतर्फी वर्चस्व राखले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, त्यांनी 3 सामन्यांमधील 2 सामने जिंकले आहेत. थायलंडच्या संघाने गुरूवारी पाकिस्तानच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला आहे. तर मलेशियाच्या संघाला अद्याप विजयाच्या खाते उघडता आले नाही.
भारतीय संघाचे वर्चस्व
स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | गुण |
1 | भारत | 3 | 3 | 0 | 6 |
2 | पाकिस्तान | 3 | 2 | 1 | 4 |
3 | श्रीलंका | 3 | 2 | 1 | 4 |
4 | बांगलादेश | 2 | 1 | 1 | 2 |
5 | थायलंड | 3 | 2 | 2 | 2 |
6 | यूएई | 3 | 2 | 2 | 2 |
7 | मलेशिया | 3 | 0 | 3 | 0 |
7 संघांमध्ये रंगतोय 'सामना' 1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.