नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी दिग्गज अष्टपैलू संजय मांजरेकर यांनी आयपीएलच्या लिलावापूर्वी एक मोठे विधान केले आहे. आयपीएलचा मिनी लिलाव २३ डिंसेबर रोजी कोची येथे होणार आहे. संजय मांजरेकर यांच्या मते आयपीएल २०२३च्या लिलावादरम्यान बेन स्टोक्सला खूप मागणी असेल. याचे कारण म्हणजे बेन स्टोक्सने नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात केलेल्या कामगिरीमुळे सर्व संघांच्या नजरा त्याच्याकडे असतील.
बेन स्टोक्सबद्दल भाष्य करायचे झाले तर, टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. इंग्लंडला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने संघासाठी अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात स्टोक्सने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ४६ आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५२ धावांची शानदार खेळी केली होती.
बेन स्टोक्स मॅचविनर खेळाडू - स्टोक्सस्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना संजय मांजरेकर यांनी बेन स्टोक्सबाबत मोठी भविष्यवाणी केली. "बेन स्टोक्स हा मॅचविनर खेळाडू आहे. जर संघ प्लेऑफमध्ये गेला, तर हा खेळाडू मोठ्या मंचावर चांगली कामगिरी करतो", अशा शब्दांत मांजरेकर यांनी स्टोक्सला खूप मागणी असल्याचे म्हटले.
आगामी हंगामात दिसणार स्टोक्सबेन स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो २०२१मध्ये शेवटच्या वेळी आयपीएलमध्ये खेळला होता. राजस्थान रॉयल्सकडून पहिला सामना खेळताना त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर संपूर्ण हंगामातून तो बाहेर पडला. विशेष बाब म्हणजे आयपीएल २०२२चा देखील तो हिस्सा नव्हता. आयपीएलमध्ये आतापर्यंत बेन स्टोक्सने ४३ सामन्यांत ९२० धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट १३४ आहे. त्याचबरोबर त्याने २८ बळी देखील पटकावले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"