नवी दिल्ली : भारतीय संघातून सध्या बाहेर असलेला फलंदाज मयंक अग्रवाल पिता झाला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबात माहिती दिली. यासोबतच त्याने मुलाचे नावही जगासमोर उघड केले आहे. मयंकने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पत्नी आणि त्याने मुलाला हातात घेतले आहे. त्यासोबत त्याने लिहिले की, "आमचे मन कृतज्ञतेने भरले आहे आणि आम्ही अयांशला तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. प्रकाशाचा पहिला किरण, आपला वाटा आणि देवाची देणगी."
खरं तर मयंकच्या मुलाचा जन्म ८ डिसेंबरला झाला असून त्याने आता मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. मयंक अग्रवालने जून २०१८ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण आशिता सूदसोबत लग्न केले, जी पेशाने वकील आहे. दोघेही शालेय जीवनापासून मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आशिताचे वडील प्रवीण सूद सध्या कर्नाटकचे डीजीपी आहेत. मयंक सध्या भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी पंजाब किंग्जने त्याला रिलीज केले आहे. त्यामुळे तो लिलावाच्या रिंगणात असून त्याची बेस प्राइज १ कोटी आहे.
अग्रवाल लिलावाच्या रिंगणातआयपीएल २०२२ पूर्वी पंजाब किंग्जने त्याला १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते, परंतु यावर्षी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी त्याला रिलीज केले आहे. लोकेश राहुल नवनिर्वाचित फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्समध्ये गेल्यानंतर पंजाब किंग्सने २०२२ मध्ये मयंकला संघाचा कर्णधार बनवले. मात्र मागील आयपीएल हंगामात मयंकसोबत पंजाब किंग्जची कामगिरीही खराब झाली होती. यानंतर या फ्रँचायझीने शिखर धवनला आयपीएल २०२३ साठी संघाचा कर्णधार बनवले आहे. अलीकडेच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या ९ सामन्यात मयंक अग्रवालने २६ च्या सरासरीने २११ धावा केल्या आहेत.
मयंक भारतीय संघाबाहेरमयंक अग्रवालने भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना यावर्षी मार्चमध्ये बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळला होता. या सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"