नवी दिल्ली : भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत क्रिकेटला रामराम केले आहे. मुरली विजय मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. एकेकाळी त्याला भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज मानले जायचे. त्याने 61 कसोटी सामन्यांमधील 57 डावांमध्ये भारतासाठी सलामी देताना 40 च्या सरासरीने 3880 धावा केल्या आहेत.
अलीकडेच त्याने भारतीय संघात स्थान न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मुरलीने सांगितले होते की, "बीसीसीआयसोबतचा माझा संबंध आता जवळपास संपला आहे आणि मी आता विदेशात संधी शोधत आहे. मला अजूनही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आहे." तसेच त्याने संधी न मिळाल्याने अस्वस्थ असल्याचे म्हटले होते. "आपण 30 वर्षांचे झाल्यावर अस्पृश्य बनतो. मला वाटते की यानंतर सर्वजण 80 वर्षाचे म्हणून पाहू लागतात. प्रसारमाध्यमेही आपल्याला असेच दाखवतात. मला वाटते की मी अजूनही माझे सर्वोत्तम देऊ शकतो. पण दुर्दैवाने खूप कमी संधी आहेत आणि आता मला देशाबाहेर संधी शोधाव्या लागत आहेत", असे त्याने अधिक म्हटले होते.
सेहवागसारखा पाठिंबा मिळाला नाही...या मुद्द्यावर तो आणखी म्हटला होता की, जर मला वीरेंद्र सेहवागसारखा पाठिंबा मिळाला असता तर कदाचित माझ्यासाठी परिस्थिती वेगळी असती. पण आता विचार करण्यात अर्थ नाही. मी आता विदेशात क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहे.
मुरली विजयने एक लांबलचक पत्रक काढून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. "आज, अपार कृतज्ञता आणि नम्रतेने, सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. 2002-2018 पर्यंतचा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक आहे. कारण भारताच्या सर्वोच्च स्थानावर प्रतिनिधित्व करणारा तो सन्मान होता."
क्रिकेट बोर्डांचे मानले आभार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि केमप्लास्ट सनमार यांनी मला दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा शब्दांत मुरलीने क्रिकेट बोर्डांचे देखील आभार मानले. "माझ्या सर्व संघ-सहकाऱ्यांना, प्रशिक्षकांना, मार्गदर्शकांना आणि सपोर्ट स्टाफसाठी तुम्हा सर्वांसोबत खेळणे हा एक विशेष विशेषाधिकार आहे आणि माझे स्वप्न सत्यात बदलण्यास मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो."
नवीन अध्यायाची वाट पाहतोय... मुरली विजयने अलीकडेच म्हटल्याप्रमाणे तो इतरत्र संधी शोधणार आहे. "मी क्रिकेटच्या जगात नवीन संधी शोधणार आहे. जिथे मला आवडणाऱ्या आणि नवीन आणि वेगळ्या वातावरणात स्वतःला आव्हान देणाऱ्या खेळात मी सहभागी होत राहीन हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे आणि मी या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे", अशा शब्दांत मुरली विजयने विदेशात क्रिकेट खेळणार असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"