अहमदाबाद: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतील शेवटचा सामना 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ज्यासाठी दोन्ही संघ आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. या निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी चित्रपटगृहात जाऊन नुकताच प्रदर्शित झालेला पठाण चित्रपट पाहिला. चित्रपटगृहातील खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, अभिनेता शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. मंगळवारी संध्याकाळी टीम इंडियाचे काही खेळाडू चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले. यामध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शिवम मावी, राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या खेळाडूंचा समावेश होता.
अहमदाबादमध्ये होणार निर्णायक सामना लक्षणीय बाब म्हणजे आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा निर्णायक सामना होणार आहे. खरं तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकही ट्वेंटी-20 मालिका गमावली नाही. मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाहुण्या किवी संघाने 21 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात यजमान भारताने 6 गडी राखून विजय मिळवत पुनरागनमन केले. अशा स्थितीत दोन्ही संघ शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. 2023 मध्ये भारताने अद्याप एकही मालिका गमावलेली नाही. मात्र, या मालिकेत संघाच्या सलामीच्या जोडीने निराशा केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या ट्वेंटी-20 मध्ये इशान किशनच्या जागी पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"