Indian team selection reports for T20 World Cup 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील कामगिरीच्या जोरावर आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून पासून वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारताला अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी BCCI कोणताच प्रयोग करू इच्छित नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी कितीही चांगली कामगिरी केली तरी त्यांना संधी मिळणे अवघड आहे.
आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय
आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल २०२४ मधील कामगिरी लक्षात घेऊनच BCCI व निवड समिती भारताचा संघ निवडणार आहे. येत्या २८ व २९ एप्रिलला नवी दिल्ली येथे रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समिती प्रमुख अजित आगरकर व अन्य सदस्य यांच्यात बैठक पार पडणार आहे. १ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या बैठकीतच अंतिम १५ जणांचा संघ जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. हार्दिक पांड्याच्या निवडीवरून या बैठकीत अधिक चर्चा रंगेल, अशी अपेक्षा आहे. वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये जखमी झाल्यानंतर हार्दिक थेट आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर परतला, परंतु त्याला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. तो अपेक्षित गोलंदाजीही करत नाही.
हार्दिकला टक्कर देण्यासाठी शिवम दुबे आहेच आणि तो फलंदाजीत चमकदार कामगिरी करून दाखवतोय.. यष्टिरक्षक-फलंदाज यासाठीही चांगली टक्कर आहे, परंतु काल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ज्या प्रकारे खेळला ते पाहता त्याची निवड निश्चित झाल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. यष्टिरक्षक-फलंदाजासाठी तो पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे. दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूसाठी लोकेश राहुल व संजू सॅमसन यांच्या टक्कर आहे, परंतु याहीवेळेस संजू मागे पडणार असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा व कुलदीप यादव यांची निवड पक्की मानली जात आहे. रवी बिश्नोई, आवेश खान व अक्षक पटेत यांच्यात एका जागेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळतेय.
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
Web Title: Indian team selection reports- Rishabh Pant has sealed his place as the India's No.1 Keeper batter in T20 World Cup 2024, KL Rahul holds the edge over Sanju Samson as 2nd wicket keeper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.