केपटाऊन : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अर्धा संघ बाद करताच भारताने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावात संपवून १३ धावांची आघाडी मिळविली. भारताने २२३ धावा केल्या होत्या. बुमराहच्या पाच बळींशिवाय उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी २-२ तर शार्दुल ठाकूरने एक गडी बाद केला. यजमानांकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. बुमराहने कारकिर्दीत सातव्यांदा पाच गडी बाद केले. द. आफ्रिकेविरुद्ध त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.
१ बाद १७ वरून पुढे खेळणाऱ्या यजमानांची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात बुमराहने ऐडन मार्करामची दांडी गूल केली. उमेश यादवने केशव महाराजला त्रिफळाचीत केले. उमेशच्याच चेंडूवर रासी वॉन दुसेनने विराटकडे झेल दिला. शमीने तीन चेंडूत तेम्बा बावुमा आणि काइल वेरेन यांना टिपले. बुमराहने चहापानाआधी जेन्सेनला त्रिफळाबाद केले. पीटरसनला मात्र दोनवेळा जीवदान मिळाले.
शार्दुलच्या चेंडूवर विराटने त्याचा स्लिपमध्ये झेल सोडला. यानंतर कोहलीनेच दुसऱ्या आणि पहिल्या स्लिपच्या मध्ये पुन्हा झेल सोडला. पीटरसनने १६६ चेंडूंत ९ चौकार मारले. यानंतर यजमानांनी भारताची दुसऱ्या डावात १७ षटकांमध्ये २ बाद ५७ धावा अशी अवस्था केली. चेतेश्वर पुजारा (९*) आणि विराट कोहली (१४*) नाबाद आहेत.
धावफलक भारत (पहिला डाव) : सर्वबाद २२३.द. आफ्रिका (पहिला डाव) : एल्गर झे. पुजारा गो. बुमराह ३, मार्कराम त्रि. गो. बुमराह ८, महाराज त्रि. गो. यादव २५, पीटरसन झे. पुजारा गो. बुमराह ७२,वॉन दुसेन झे. कोहली गो. यादव २१, बावुमा झे. कोहली गो. शमी २८, वेरेने झे. पंत गो. शमी ०, जेन्सेन त्रि.गो. बुमराह ७, रबाडा झे. बुमराह गो. शार्दुल १५, डेन ऑलिव्हर नाबाद १०, एनगिडी झे. अश्विन गो. बुमराह ३, अवांतर : १८, एकूण : ७६.३ षटकात सर्वबाद २१०.बाद क्रम : १-१०, २-१७, ३-४५, ४-११२, ५-१५९, ६-१५९, ७-१७६, ८-१७९, ९-२००, १०-२१०. गोलंदाजी : बुमराह ४२-५, यादव ६४-२, शमी ३९-२, ठाकूर ३७-१, अश्विन१५-०.भारत (दुसरा डाव) : राहुल झे. मार्करम गो. जेन्सन १०, अग्रवाल झे. एल्गर गो. रबाडा ७, पुजारा खेळत आहे ९, कोहली खेळत आहे १४. अवांतर : १७. एकूण : १७ षटकांत २ बाद ५७ धावा. बाद क्रम : १-२०, २-२४.
महत्त्वाचे
जसप्रीत बुमराहने सातव्यांदा अर्धा संघ बाद केला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 'सेना' (एसईएनए) देशांमध्ये मोहम्मद शमीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून २०१ बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो अनिल कुंबळे, जवगल श्रीनाथ आणि कपिल देव यांच्यानंतरचा चौथा भारतीय ठरला. बुमराहने 'सेना' देशांमध्ये पाचव्यांदा अर्धा संघ बाद केला. विराट कोहलीने शंभर कसोटी झेल पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय ठरला. राहुल द्रविडचे सर्वाधिक २०९ झेल असून व्हीव्हीएस लक्ष्मण (१३५), सचिन तेंडुलकर (११५), सुनील गावसकर (१०८), मोहम्मद अझहरुद्दीन (१०५) यांनी शंभर झेल घेतले आहेत.