पोर्ट एलिझाबेथ : चौथ्या लढतीत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत येथे प्रथमच मालिका विजय साजरा करण्यास प्रयत्नशील आहे. सहा सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर असून त्याचा लाभ घेण्यास उत्सुक आहे. भारताने डर्बनमध्ये पहिल्या लढतीत सहा गड्यांनी, सेंच्युरियनमध्ये दुसºया लढतीत ९ गड्यांनी आणि केपटाऊनमध्ये तिसºया लढतीत १२४ धावांनी विजय मिळवल होता. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या चौथ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले.दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज विरुद्ध भारतीय फिरकीपटू अशी लढत महत्त्वाची आहे. जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे दोनदा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे भारतीय फलंदाजी व गोलंदाजीची लय बिघडली होती. महत्त्वाचे म्हणजे पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर यजमान संघाला सुधारित लक्ष्य मिळाले. एबी डिव्हिलियर्स लवकर परतल्यानंतरही त्यांना विजय मिळवण्यात अधिक अडचण भासली नाही. डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासनने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत विजय हिसकावून नेला.झेल सोडण्याव्यतिरिक्त मिलरला ‘नोबॉल’ टाकणे भारतीय संघासाठी नुकसान करणारे ठरले. या विजयामुळे मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्याविरुद्ध खेळण्याचे तंत्र गवसले असल्याचे सिद्ध झाले. त्याचसोबत भुवनेश्वर व बुमराह यांचा योग्य वापर करण्यात आला नाही. कारण विराट कोहलीने फिरकीपटूंवर अतिरिक्त विश्वास दाखविला. फिरकीपटूंना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
- रोहित शर्माच्या खराब फॉर्मनंतरही भारताची आघाडीची फळी मजबूत आहे. रोहितने पहिल्या चार सामन्यात ४० धावा केल्या. गेल्या १२ सामन्यांत त्याची एकदिवसीयतील सरासरी ११.४५ अशी आहे.कोहली (३९३) व शिखर धवन (२७१) यांनी चमकदार कामगिरी केली तर उर्वरित फलंदाजांनी केवळ २३९ धावा केल्या. भारतीय थिंक टँकसाठी हा चिंतेचा विषय आहे.दक्षिण आफ्रिका संघ भारतीय फलंदाजी फळीच्या कमकुवत बाजूचा लाभ घेत कोहली व धवनला झटपट माघारी परतवण्यास प्रयत्नशील राहील. त्यामुळे यजमान संघ गोलंदाजीमध्ये कुणाला संधी देत, याबाबत उत्सुकता आहे.केदार जाधवची अनुपस्थिती जाणवलीकेदार जाधवच्या फिटनेसवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्याला केपटाऊनमध्ये स्नायूच्या दुखापतीने सतावले होते आणि गेल्या लढतीत खेळता आले नाही. जाधवच्या अनुपस्थितीत भारताने एक विश्वासपात्र गोलंदाजाचा पर्याय गमावला. जाधव संथ फिरकी गोलंदाजी करण्यास सक्षम असून परिस्थितीनुरुप गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या अनुपस्थितीतभारताकडे अधिक पर्याय नाही. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात जानेवारी २०१६ मध्ये पर्थ येथे गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने गोलंदाजी केलेली नाही. मधल्या फळीत समस्या असली तरी संघाला जाधवच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीची अधिक उणीव भासली.प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.दक्षिण आफ्रिका :- ऐडन मार्करम (कर्णधार), हाशिम अमला, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिहले जोंडो, फरहान बेहारडियन, हेन्रिक क्लासन, एबी डिव्हिलियर्स.सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० पासून