मुंबई: पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेट सामना रंगणार आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. याच महिन्यात दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे.
बीसीसीआयनं याच महिन्यात होत असलेल्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धा भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. लवकरच अंडर-१९ विश्व चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
आशिया स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कुवेत आणि यूएईचे सहभागी होतील. यश धुल आशिया स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. २३ डिसेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. २५ डिसेंबरला भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने उभे ठाकतील. त्यानंतर २७ डिसेंबरला भारतासमोर अफगाणिस्तानचं आव्हान असेल. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना ३० डिसेंबरला होईल. १ जानेवारीला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ-हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल, वासू वत्स