Join us  

भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळणार; श्रेयस अय्यर-रहाणे यांच्यात चुरस

पाचव्या स्थानी कोण? हा प्रश्न कायम असून यासाठी श्रेयस अय्यर- अजिंक्य रहाणे यांच्यात चुरस पाहायला मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 8:44 AM

Open in App

सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी सुरू होणाऱ्या पहिल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणार असल्याचे संकेत संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल याने शुक्रवारी दिले. पाचव्या स्थानी कोण? हा प्रश्न कायम असून यासाठी श्रेयस अय्यर- अजिंक्य रहाणे यांच्यात चुरस पाहायला मिळेल.

भारतीय संघ आठवडाभरापासून येथे सरावात व्यस्त असून द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी होण्यासाठी चांगली सुरुवात आवश्यक असल्याचे मत राहुलने व्यक्त केले. भारताने येथे कधीही मालिका जिंकलेली नाही. चार गोलंदाजांसह खेळल्यामुळे अतिरिक्त ताण येण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे काय? असा प्रश्न राहुला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला,‘होय, कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला २० गडी बाद करणे गरजेचे असते. आम्हीदेखील हेच डावपेच आखले आहेत. विदेशात जे सामने खेळलो त्यात आम्हाला मदतही लाभली.’

- पाचवा खेळाडू कोण याचा निर्णय घेणे कठीण आहे. अजिंक्य हा कसोटी संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याने कारकिर्दीत अनेकदा चांगली खेळी केली आहे.  मागच्या १५ ते १८ महिन्यात अजिंक्यने धावा काढल्याशिवाय सामने जिंकून दिले. लॉर्ड्सवर पुजारासोबतची अजिंक्यची खेळी सामना जिंकण्यासाठी फारच उपयुक्त ठरली होती.

- दुसरीकडे श्रेयसने संधीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. कानपूर कसोटीत त्याने पदार्पणातच शतक आणि अर्धशतक ठोकले. हनुमानेदेखील संघासाठी उपयुक्त योगदान दिले असल्याने एकाची निवड करताचा फार डोकेदुखी होणार आहे.’

शार्दुल ठाकूर दावेदार

चौथा गोलंदाज हा वेगवान असेल, असेही राहुलने स्पष्ट केले. पाच गोलंदाज असतील तर गोष्टी सोप्या होतात. भारतीय संघात असे कौशल्यवान खेळाडू असल्यामुळे आम्ही याचा वापर करू शकतो.’ शार्दुल ठाकूर  हा फलंदाजीतील कौशल्यामुळे इशांत शर्माच्या तुलनेत थोडा वरचढ ठरतो.  याचा अर्थ असा की अय्यर, रहाणे किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका
Open in App