नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सावधगिरी म्हणून विलगीकरणात असलेल्या पाच भारतीय खेळाडूंसह पूर्ण भारतीय संघ मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी एकत्र विशेष विमानाने सोमवारी मेलबोर्नहून सिडनीला रवाना होईल.
भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांच्याविरुद्ध कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जैव सुरक्षा प्रोटोकॉलचे कथित उल्लंघन प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण संघाला प्रवास करण्यापासून रोखण्यात येणार नाही.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, प्रकरणाची चौकशी बीसीसीआयसोबत (भारतीय क्रिकेट बोर्ड) करण्यात येत आहे.
नवलदीप सिंग नावाच्या प्रशंसकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात हे पाच भारतीय खेळाडू एका हॉटेलमध्ये भोजन करीत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. ऑस्ट्रेलियाच्या हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतीवर भारतीय संघ खूश नसल्याचे वृत्त आहे. सूत्राने सांगितले, ‘त्या प्रशंसकाने जर सोशल मीडियावर खेळाडूची (पंत) गळाभेट घेतल्याचे खोटे सांगितले नसते, तर हे प्रकरण वाढले नसते. पाऊस पडत असल्यामुळे खेळाडू हॉटेलमध्ये गेले. त्याने कुणाची परवानगी न घेता व्हिडिओ तयार केला आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी बिलाची रक्कम देत त्याने सोशल मीडियावर टाकले. जो सुरुवातीला खोटे बोलला आणि त्यानंतर त्याने आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली, क्रिकेट ऑस्ट्रेलिया अशा व्यक्तीच्या व्हिडिओच्या आधारे निर्णय घेईल ? असा प्रश्न आहे. पूर्ण प्रकरणानंतर संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डोंगरे बीसीसीआयचे कर्मचारी आहेत आणि त्यांनी कोविड-१९ प्रोटकॉलसंदर्भात संघाला सांभाळले आहे.
अधिकारी पुढे म्हणाले, ‘खेळाडूंसाठी प्रोटोकॉलमधील प्रत्येक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी खेळाडू इंडोअर भागात जाऊ शकत नाही, हे सांगणे डोंगरे यांचे कर्तव्य होते.’
ऑस्ट्रेलियन मीडियाने रविवारी दावा केला होता की, ब्रिस्बेनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक असल्यामुळे भारतीय संघ चौथा कसोटी सामना तेथे खेळण्यास इच्छुक नाही, पण वृत्तानुसार मालिकेतील चौथा व अखेरचा कसोटी सामना निर्धारित कार्यक्रमानुसार १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळला जाईल.
क्विन्सलँड राज्याचे नियम वेगळेn न्यू साऊथ वेल्स (सिडनीमधील तिसऱ्या कसोटी सामन्याचे स्थळ) आणि क्विन्सलँड राज्य (ब्रिस्बेन) सरकार यांच्यादरम्यान कोविड-१९ बाबत सीमा प्रतिबंध समस्या आहे. सिडनी व जवळपासच्या भागात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता क्विन्सलँडने न्यू साऊथ वेल्सवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. कसोटी सामना त्यासाठी अपवाद असेल आणि खेळाडू आयपीएलसारखे सक्तीच्या बायोबबलमध्ये असतील.n बीसीसीआयने अद्याप चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनहून सिडनीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत संपर्क साधलेला नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘परिस्थिती बदलत आहे. त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करायला हवी.’
n बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘जर तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) स्पष्टीकरण वाचाल तर त्यांनी त्यात नियमाचे उल्लंघन झाल्याचे म्हटलेले नाही. n हे उल्लंघन आहे किंवा नाही, याची ते शहानिशा करतील. त्यामुळे संघासोबत सिडनीला जाणाऱ्या या पाच खेळाडूंवर कुठली बंदी नाही. पूर्ण संघ सोमवारी दुपारी सिडनीला रवाना होईल.’