भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान; रोमहर्षक सामन्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज

भारत-इंग्लंड हा सामना एकप्रकारे अंतिम सामन्याआधीचा अंतिम सामना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:45 AM2024-06-27T06:45:28+5:302024-06-27T06:45:50+5:30

whatsapp join usJoin us
Indian team's mission final England's bitter challenge Cricket world is ready for a thrilling match | भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान; रोमहर्षक सामन्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज

भारतीय संघाचे ‘मिशन फायनल’ इंग्लंडचे कडवे आव्हान; रोमहर्षक सामन्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

गयाना : भारत-इंग्लंड हा सामना एकप्रकारे अंतिम सामन्याआधीचा अंतिम सामना आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने हा सामना नक्कीच रोमांचक होईल, यात शंका नाही. पहिल्या उपांत्य सामन्यात आफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका भिडले आणि या सामन्याची मोठी चर्चा झाली असली, तरी सर्वांचे लक्ष लागले आहे ते, भारत-इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या लढतीकडे. दोन्ही संघांचे संयोजन आणि मजबूत पक्ष हे जवळपास एकसमान आहे. त्यामुळे ही लढत रोमहर्षक होईल. इतिहास विसरू नका!

भारताची आतापर्यंत वाटचाल अपराजित ठरली आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांची अडखळती वाटचाल झाली आहे. पण, इंग्लंड गतविजेते आहेत, हे विसरून चालणार नाही. याशिवाय, २०२२ च्या टी-२० विश्वचषकातही याच दोन संघांमध्ये उपांत्य सामना रंगला होता आणि त्यात इंग्लंडने भारताला दहा गड्यांनी नमवून अंतिम फेरी गाठली होती आणि नंतर विश्वविजेतेपदही पटकावले होते. तेव्हापासून आता खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत, पण इतिहास विसरता कामा नये. भारतीय फलंदाजांना अचूक फटके खेळावे लागतील, तसेच भारतीयांना क्षेत्ररक्षणातही अचूक कामगिरी करावी लागेल. 

दोन्ही कर्णधारांवर लक्ष
- रोहित शर्माने केलेल्या धुवाधार फटकेबाजीने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. पुन्हा एकदा त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. परंतु, दुसरीकडे अशाच प्रकारच्या फॉर्ममध्ये इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरही आहे. त्यामुळे या सामन्यात या दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर खूप काही अवलंबून राहणार आहे. 
- इंग्लंडचा जॉनी बेयरस्टोही चांगल्या लयीत असून त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभवही आहे. हॅरी ब्रूक आणि फिल सॉल्ट हेही स्फोटक फटकेबाजीची क्षमता राखून आहेत. त्यामुळे इंग्लंडची आघाडी फळी अत्यंत मजबूत दिसत आहे. 
- याशिवाय, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन यांचा अष्टपैलू खेळ इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरेल. शिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे वेगवान गोलंदाजही तळाच्या फळीत उपयुक्त फटकेबाजी करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे भारत-इंग्लंड या दोन्ही संघांची फलंदाजी खोलवर आहे. 

तुल्यबळ संघ
जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्यावर भारताची गोलंदाजी अवलंबून असून तिघेही ‘विकेट टेकर’ ठरले आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी, दोघांनी मोक्याच्या वेळी चांगले योगदान दिले आहे. अक्षरने याबाबत चांगली कामगिरी केली आहे. जडेजाचा प्रदीर्घ अनुभव या निर्णायक सामन्यांसाठी उपयोगी येऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे दोघेही अष्टपैलू आहेत. त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या भारतासाठी शानदार ठरला आहे. इंग्लंडकडे मार्क वूड, आर्चर, ख्रिस जॉर्डन, रीस टोप्ले असा वेगवान मारा आहे. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. 

प्रेक्षकांचा मिळणार पाठिंबा
गयानामध्ये भारताला मोठा पाठिंबा मिळेल. कारण, येथे भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. केवळ भारतच नाही, तर येथे आशियाई संघांना नेहमीच मोठा पाठिंबा मिळतो. याचा फायदाही भारताला मिळेल. 

प्रथम फलंदाजी करावी
नाणेफेकीचा कौल या सामन्यात महत्त्वाचा ठरणार असून नाणेफेक जिंकल्यास भारताने प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचावी. कारण, भारताची गोलंदाजी सध्या जबरदस्त लयीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासारखी खेळपट्टी मिळाल्यास नक्कीच प्रथम फलंदाजी करावी.  

Web Title: Indian team's mission final England's bitter challenge Cricket world is ready for a thrilling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.