भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला हरयाणाचा क्रिकेटपटूने चुना लावण्याची घटना समोर आली आहे. मृणांक सिंग असे या आरोपी क्रिकेटपटूचं नाव आहे. रिषभ पंत आणि त्याचा मॅनेजर पुनीत सोलंकी यांनी मृणालविरोधात तक्रार दाखल केली आहे. पंतला बाऊन्स धनादेशाच्या माध्यमातून १.६३ कोटींचा चुना लावला. रिषभला फ्रँक म्युलर वॅनगार्ड यॉटिंग सीरिजचे घड्याळ हवे होते. त्यासाठी त्याने ३६ लाख २५, १२० रुपये दिले होते आणि रिचर्ड मिल घड्याळासाठी ६२ लाख, ६० हजार रुपये दिले होते.
मृणांकने चुकीचे रेफरन्स देऊन रिषभचा विश्वास जिंकला आणि महागड्या घड्याळ्यांसाठी १.६३ कोटी रुपये त्याच्याकडून घेतले. जानेवारी २०२१चे हे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वीच मृणांकला अटक करण्यात आले आहे. पण, त्याला वेगळ्याच प्रकरणात अटक केले गेले आहे. त्यातही त्याने एका व्यावसायिकाला महागडी घड्याळं आणि मोबाईल स्वस्त दरात देतो असे आमीष दाखवले होते. तो आता मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
''जानेवारी २०२१मध्ये मृणांकने महागडी घड्याळं, बॅग्स, दागिने आदी वस्तू खरेदी-विक्री करण्याचा बिझनेस सुरू केल्याचे रिषभ व सोलंकी यांना सांगितले. यावेळी त्याने अनेक क्रिकेटपटूंचा रेफरन्स त्यांना दिला.रिषभ व त्याच्या मॅनेजरला त्याने चांगल्या सवलतीत व स्वस्त दरात महागडी घड्याळं देणार असल्याचे सांगितले,''असे या तक्रारीत म्हटले आहे.