भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. मागून आलेले रिषभ पंत, इशान किशन यांनीही सॅमसनपेक्षा अधिक ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. आता तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात रिषभने पुन्हा स्थान पटकावले आहे. इशान २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. पण, संजूला पुन्हा डावलले गेले आणि त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
BCCI ने सोमवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय व ४ राखीव खेळाडूसह भारतीय संघ जाहीर केला. मुख्य संघात नको, परंतु राखीव खेळाडूंमध्ये तरी संजू सॅमसनचे नाव अनेकांना अपेक्षित होती. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरियासह अनेकांनी संजूसाठी बॅटिंग करून बीसीसीआयला जाब विचारला. फॉर्माशी झगडणाऱ्या रिषभला संधी दिल्याने चाहते अधिक खवळले. राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरच्या जागी संजूला संधी मिळायला हवी होती असेही मत अनेकांनी व्यक्त केले. त्यात आता संजू सॅमसनची पोस्ट व्हायरल झाली आहे.