नवी दिल्ली : तुझे करीअर संपवून टाकेन, अशी धमकी देत प्रशिक्षक माझा विनयभंग करत असून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप एका भारताच्या एका महिला क्रिकेपटूने केला आहे. या प्रकरणी या महिला क्रिकेटपटूने माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरकडे मदत मागितल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
या महिला क्रिकेटपटूने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. या महिला क्रिकेटपटूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " तुझी कारकिर्द संपवून टाकेन, अशी धमकी देत माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न संघाचे प्रशिक्षक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणी मला गौतम गंभीर यांनी मदत करावी."
या महिला क्रिकेटपटूने ३० डिसेंबरला एक ट्विट करत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. या ट्विटमध्ये तिने प्रशिक्षकाचा नावाचा उल्लेख केला नसला तरी ती व्यक्ती नेमकी कोण, हे समजणे फारसे कठीण नाही. आपल्या टि्वटमध्ये ही महिला क्रिकेटपटू ट्विटरवर म्हणाली आहे की, " मी दिल्लीची एक महिला क्रिकेटपटू आहे. माझी कारकिर्द संपवून टाकेन, अशी धमकी देत प्रशिक्षकांनी माझा विनयभंग केला आहे. त्याचबरोबर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला आहे. या प्रशिक्षकांचे निवड समिती सदस्यांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या एका शब्दावर माझे करीअर धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ते मला करीअर संपवण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे कृपया या प्रकरणाची दखल घेत मला गौतम गंभीर यांनी मदत करावी,"
गंभीर हा ट्विटरवर नेहमीच अॅक्टीव असल्याचे आपण पाहिले आहे. या महिला क्रिकेटपटूने ३० डिसेंबरला आपली व्यथा व्यक्त करून ट्विटरच्या माध्यमातून गंभीरला टॅग केले आहे. पण अजूनही गौतमने याची गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे दिल्लीतील महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.