harmanpreet kaur latest news : सध्या श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय संघाचा विजयरथ कायम आहे. भारत स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडिया आठव्यांदा आशिया चषक उंचावणार का हे पाहण्याजोगे असेल. कर्णधार हरमनचा इथपर्यंतचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. क्रिकेट म्हणजेच देव आणि हेच माझे जीवन असे ती सांगते. मला वाटते की क्रिकेट हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. क्रिकेटशिवाय मी कोणताच विचार करू शकत नाही. क्रिकेटमुळे माझे एवढे नाव झाले आहे. त्यामुळे क्रिकेट माझ्यासाठी देवासमान आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न, मिळालेली उंची आणि ओळख हे सर्वकाही क्रिकेटमुळे झाले असल्याचे हरमन सांगते.
तसेच मी सर्वप्रथम भारताची जर्सी परिधान केली तो क्षण अविस्मरनीय आहे. मी तेव्हा माझा एक फोटो काढला आणि पालकांना पाठवला. माझ्या या यशामागे आई-वडिलांचा मोठा हात आहे. त्यांच्याशिवाय प्रशिक्षकांनीही माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. मी शाळेत होती तेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आधी मी घाबरून क्रिकेट खेळतेय असे वाटायचे. जेव्हा गोष्टी माझ्या प्लॅननुसार होत नसत, तेव्हा मी खूप लवकर घाबरायचे. पण हळू हळू धाडसी क्रिकेट खेळायला शिकले, असेही हरमनप्रीत कौरने सांगितले. ती 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलत होती.
हरमनने भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल म्हटले की, मागील सात-आठ वर्षांपासून टीम इंडियाने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याआधी देखील भारताचा महिला क्रिकेट संघ मजबूत होता. पण, तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवता आले नाही. प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आल्याने चाहते निराश होते. त्यामुळे आम्ही नेहमीच याबद्दल विचार करत असतो. शक्य तितके आक्रमक क्रिकेट खेळायला हवे यावर संघातील खेळाडूंचे एकमत आहे. दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील काही कालावधीपासून चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत टीम इंडियाने रौप्य पदक जिंकले. तर ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.