मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागला असून, सध्या मायदेशात इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली आहे. मात्र, आम्ही जबरदस्त पुनरागमन करू असा विश्वास भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. दुसऱ्या सामन्याच्या तोंडावर भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ज्या खेळाडूंची निवड इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी झाली आहे, त्यांना मोठ्या कालावधीपर्यंत संधी दिली जाईल. जेणेकरून ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी एक चांगला संघ तयार होईल, असे हरमनप्रीतने सांगितले.
भारतीय कर्णधाराने आणखी सांगितले की, माझे स्वप्न विश्वचषक जिंकण्याचे आहे, म्हणूनच निवडकर्त्यांना एक युवा संघ निवडण्याची विनंती केली. तीतस साधूची तब्येत ठीक नसल्यामुळे ती पहिल्या सामन्याला मुकली. इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी आम्ही निवडलेल्या संघातील खेळाडूंना घेऊन आम्हाला विश्वचषकासाठी संघ बनवायचा आहे. सायका आणि श्रेयंका पाटील यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास चांगला आहे.
हरमननं सांगितली 'रणनीती' तसेच अनेक वर्षांपासून आपण क्षेत्ररक्षणाबद्दल खूप बोलत आहोत आणि क्षेत्ररक्षण ही अशी एक गोष्ट आहे, ज्यामध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. शेवटच्या सामन्यातील चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आणि चांगले क्षेत्ररक्षण केले. खेळाडू मैदानात स्वत:ला झोकून देत होते. एक कर्णधार आणि एक खेळाडू या नात्याने आमची क्षेत्ररक्षण खूप मजबूत असावी असे मला वाटते, असेही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.