Join us

टीम इंडियाची प्रजासत्ताक दिनी चाहत्यांना खास भेट; विजयाचा चौकार मारत गाठली सेमीफायनल

Team India into Semi Final, ICC U19 Women's  T20 World Cup 2025 : आजच्या विजयासह भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:29 IST

Open in App

Team India into Semi Final, ICC U19 Women's  T20 World Cup 2025 : भारतात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी चाहत्यांना छान भेट दिली. भारताच्या अंडर१९ महिला संघाने मलेशियामध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-6 मध्ये बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला. स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली असून आजच्या विजयासह भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला.

प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाचा एकतर्फी विजय

भारत आणि बांगलादेश यांच्यातील ICC U19 Women's  T20 World Cup 2025 चा हा सामना क्वालालंपूर येथील ब्युमास ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ८ गडी राखून विजय मिळवला. मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत बांगलादेशचा स्वस्तात पाडाव केला. भारताने बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ ६४ धावाच करुन दिल्या. बांगलादेशची कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.

भारताने लक्ष्याचा केला सहज पाठलाग

टीम इंडियाने ६५ धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळके हिने नाबाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला.

याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांनाही पराभूत केले आहे. अशा स्थितीत भारतीय महिला संघ पुन्हा एकदा विश्वचषक विजेतेपदाचा मोठा दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाला आता २८ जानेवारीला स्कॉटलंड विरुद्ध आपला पुढचा सामना खेळायचा आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024महिला टी-२० क्रिकेटभारतबांगलादेश