भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने महिलांची देखील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली. पण, इंग्लंडची अनुभवी खेळाडू टॅमी ब्यूमोंटच्या म्हणण्यानुसार, जगात केवळ तीनच महिला संघ प्रामुख्याने कसोटी क्रिकेट खेळतात, त्यामुळे ही स्पर्धा ठेवणे योग्य ठरणार नाही. पुरुष क्रिकेटमध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सुरू झाली. सध्या या स्पर्धेचे तिसरे सत्र सुरू आहे. महिला क्रिकेटमध्ये अशी कोणतीही स्पर्धा नाही. महिला क्रिकेटमध्ये फक्त भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ नियमित कसोटी क्रिकेट खेळतात.
स्मृती मानधनाने मंगळवारी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. "जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. मात्र, याबद्दल बोर्ड आणि आयसीसी निर्णय घेईल. मी मोठ्या प्रमाणात पुरूष क्रिकेट पाहिले आहे, त्यामुळे अशा स्पर्धेत खेळणे ही मोठी बाब असेल", असे स्मृतीने सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघ दोन वर्षांनंतर कसोटीचे यजमानपद भूषवत असून, इंग्लंडचा संघ सहा महिन्यांनंतर कसोटी खेळत आहे.
एका दशकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपध्ये पाय ठेवलेल्या आणि आठ कसोटी सामने खेळलेल्या इंग्लंडच्या ब्यूमोंटने सांगितले की, मला वाटत नाही महिलांच्या WTC साठी ही योग्य वेळ आहे. आताच्या घडीला केवळ तीन ते चार संघ कसोटी क्रिकेट खेळत आहेत. आयसीसीला यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि माझ्या माहितीनुसार ते करतील असे वाटत नाही. ते अद्याप जगभरात ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विकासाठी काम करत आहेत आणि यावरच लक्ष केंद्रीत करायला हवे. अधिकाधिक तिन्ही फॉरमॅटमधील द्विपक्षीय मालिका खेळवण्याची गरज आहे.