भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध स्मृतीने चांगली कामगिरी केली. तिने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. याचेच बक्षीस म्हणून आयसीसीने 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून स्मृतीची निवड केली. स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात ११३, दुसऱ्या सामन्यात १३६ आणि अखेरच्या सामन्यात ९० धावा केल्या. यजमान भारताने ३-० ने मालिका खिशात घालून पाहुण्या आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली.
वन डे मालिकेनंतर झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही स्मृती मानधनाने चांगली कामगिरी केली. सलामीवीर स्मृती आणि शेफाली वर्मा या जोडीने पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची भागीदारी नोंदवली. स्मृतीने कसोटीतदेखील शतक झळकावण्याची किमया साधली. १६१ चेंडूत १४९ धावा करून ती तंबूत परतली. मग भारताने ६ बाद ६०३ अशी धावसंख्या असताना डाव घोषित केला. भारतीय गोलंदाजांनीही सांघिक खेळी करत पाहुण्या संघाचा करेक्ट कार्यक्रम केला. अखेर टीम इंडियाने १० विकेट राखून एकमेव कसोटी सामना आपल्या नावावर केला.
प्लेयर ऑफ मंथचा पुरस्कार मिळताच स्मृतीने भारी प्रतिक्रिया दिली. जून महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्याने आनंद वाटला. आमच्या संघाने चांगली कामगिरी करून वन डे मालिका आणि कसोटी जिंकली. संघाच्या विजयात योगदान देता आले याचा आनंद आहे. मला आशा आहे की, पुढील काळातही आम्ही अशीच कामगिरी करू आणि मी संघासाठी धावा करत राहीन, असे स्मृती मानधनाने सांगितले.