अलीकडेच भारतीय महिला संघाने बांगलादेशात ट्वेंटी-२० मालिका खेळली. तीन सामन्यातील दोन सामने जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २-१ ने मालिका जिंकली. या मालिकेतून महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या मिन्नू मणीने भारतीय संघात पदार्पण केले. मिन्नूने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत चमकदार कामगिरी केली. केरळमधील वायनाड हे मिन्नूचे मूळ गाव असल्याने, राष्ट्रीय संघातील तिच्या कामगिरीबद्दल मिन्नूचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
लक्षणीय बाब म्हणजे वायनाड जंक्शनचे नाव बदलून मिन्नू मणी असे करण्यात आले आहे. आदिवासी घरातून यशाच्या शिखराकडे पावले टाकत असेलल्या मिन्नूला महिला प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये ३० लाख रूपये मिळाले होते. तिला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले. केरळमधील वायनाड येथील या २३ वर्षीय आदिवासी क्रिकेटपटूने भारतीय संघात मजल मारल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले.
३० लाख कधी पाहिले नव्हते - मिन्नूमहिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिन्नू मणीला ३० लाखांची बोली लागल्यानंतर तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले. "मी माझ्या आयुष्यात ३० लाख रुपये कधीच पाहिले नाहीत. मला आताच्या घडीला कसे वाटते आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत", असे मिन्नूने सांगितले होते.
मजुराच्या लेकीची गरूडझेपवायनाड ते महिला प्रीमिअर लीग आणि भारतीय संघ हा प्रवास मिन्नू मणीसाठी सोपा नव्हता. मिन्नूचे वडील रोजंदारी करून आपल्या मुलीला साथ द्यायचे. मिन्नू १० वर्षांची असताना तिने भाताच्या शेतात आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इयत्ता आठवीपासूनच खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी ती इडापड्डी येथील सरकारी शाळेत शिकत होती. शाळेच्या शारीरिक शिक्षण शिक्षिका अलसम्मा बेबी यांनी प्रथम मिन्नूची प्रतिभा ओळखली आणि तिला वायनाड जिल्ह्याच्या १३ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी नेले. पण मिन्नूच्या वडिलांनी क्रिकेट खेळण्यास विरोध केला. कालांतराने मिन्नूच्या जिद्दीने वडिलांचे मन जिंकले आणि त्यांनी तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.