Join us

लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू

अंडर २३ महिला वनडे ट्रॉफी स्पर्धेत दोन षटकात साधला हॅटट्रिकचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:04 IST

Open in App

महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामातील फायनल खेळल्यावर  अवघ्या ४८ तासांत पुन्हा मैदानात उतरलेल्या शफाली वर्मानं आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून दिलीये. स्फोटक फलंदाजीमुळे लेडी सेहवाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्मा देशांतर्गत क्रिकेट सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला आहे. बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला गटातील वनडे ट्रॉफी स्पर्धेत तिने हॅटट्रिकचा पराक्रम करून दाखवलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 प्री क्वार्टर फायनल लढतीत शफालीची कमालीची गोलंदाजी

या स्पर्धेत शफाली वर्मा हरयाणा संघाचे नेतृत्व करत आहे. कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात तिने दोन षटकात हॅटट्रिकचा डाव साधला. हरयाणा विरुद्ध कर्नाटक यांच्यातील सामना गुवाहाटीच्या एसीए क्रिकेट अकादमीच्या ग्राउंडवर खेळवण्यात आला. पहिल्या प्री क्वार्टर फायनल लढतीत शफालीच्या कमालीच्या गोलंदाजीमुळे कर्नाटकच्या संघाचा डाव २१७ धावांतच आटोपला. 

दोन षटकांत साधला हॅटट्रिकचा डाव

शफालीनं ४४ व्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर लागोपाठ दोन विकेट्स घेतल्यावर ४६ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली. कर्नाटकच्या ताफ्यातील सलोनीच्या रुपात शफालीनं या सामन्यातील आपली पहिली विकेट घेतली. ती ५० चेंडूत ३० धावा करून दीया यादवच्या हाती झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतली. तिची जागा घेण्यासाठी आलेली सौम्या वर्माला शफालीनं आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर नमिता डिसूजाच्या रुपात शफालीनं तिसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. ४ षटकात २० धावा खर्च करत शफाली वर्मानं या विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. 

महिला प्रीमियर लीगमध्ये केल्या होत्या ३०० पेक्षा अधिक धावा

महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शफाली वर्मा दिल्लीच्या ताफ्यातून खेळताना दिसली होती. ९ सामन्यात तिने ३०४ धावा करत संघाला फायलपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. पण अंतिम सामन्यात तिला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी तिसऱ्यांदा फायनल खेळल्यावरही दिल्ली कॅपिटल्स महिला संघाला ट्रॉफी जिंकण्याचा डाव साधता आला नाही. मुंबई इंडियन्सच्या संघानं दुसऱ्यांदा या संघाविरुद्ध फायनल बाजी मारत इतिहास रचला होता. या स्पर्धेनंतर आता शफाली पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सज्ज झालीये. 

टॅग्स :शेफाली वर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघमहिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स