दाम्बुला : भारतीय संघाने महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना आपल्या अखेरच्या साखळी लढतीत मंगळवारी नेपाळचा ८२ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १७८ धावा उभारल्यानंतर भारतीयांनी नेपाळला २० षटकांत ९ बाद ९६ धावांवर रोखले. शेफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची फलंदाजी ढेपाळली. सलामीवीर सीता राणा मगर हिने २२ चेंडूंत सर्वाधिक १८ धावांची खेळी केली. तिच्यासह बिंदू रावल (नाबाद १७), रुबिना छेत्री (१५) आणि कर्णधार इंदू बर्मा (१४) यांनीच दुहेरी धावा काढल्या. दीप्ती शर्मा (३/१३), अरूंधती रेड्डी (२/२८) आणि राधा यादव (२/१२) यांनी दमदार मारा करीत नेपाळच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
त्याआधी, भारतीयांनी शेफाली वर्मा आणि दयालन हेमलता या सलामी जोडीच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांना भारतीय संघाने या सामन्यात विश्रांती दिली. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने संघाचे नेतृत्व केले. शेफालीने ४८ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह ८१ धावा कुटल्या. हेमलताने ४२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४७ धावा केल्या. दोघींनी ८४ चेंडूंत १२२ धावांची सलामी देत गोलंदाजीतील हवा काढली. जेमिमा रॉड्रिग्जने (१५ चेंडूंत नाबाद २८ धावा) शानदार फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली.
पाक उपांत्य फेरीत
सलग तीन विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान घेतले. भारताच्या विजयाचा पाकलाही फायदा झाला असून त्यांनी देखील उपांत्य फेरीत स्थान पक्के केले.
संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकांत ३ बाद १७८ धावा (शेफाली वर्मा ८१, दयालन हेमलता ४७, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद २८; सीता राणा मगर २/२५, कबिता जोशी १/३६.)
वि. वि. नेपाळ : २० षटकांत ९ बाद ९६ धावा (सिता राणा मगर १८, बिंदू रावल नाबाद १७, रुबिना छेत्री १५, इंदु बर्मा १४; दीप्ती शर्मा ३/१३, अरुंधती रेड्डी २/२८, राधा यादव २/१२.)
Web Title: Indian women in semi-finals; beat Nepal by 82 runs; Shefali's half century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.