क्वालालम्पूर : महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन विजयानंतर अतिआत्मविश्वासामुळे पहिल्या पराभवाचे तोंड पहावे लागले. बांगलादेश संघाने भारतावर दोन चेंडू आणि सात गडी राखून अनपेक्षित विजय साजरा केला. रुमाना अहमदची अष्टपैलू कामगिरी आणि फरगना हकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगला संघाने भारताची विजयी घोडदौड रोखली.नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार मिताली राज (१५), सलामीवीर स्मृती मानधना (२) आणि पूजा वस्त्राकार (२०) या तिघी झटपट बाद झाल्या. हरमनप्रीत कौरने ४२ धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने चांगली साथ दिली. दीप्तीने २८ चेंडूत ५ चौकारांसह ३२ धावा केल्या. हरमनने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. या दोघींच्या खेळीमुळे भारताला २० षटकात ७ बाद १४१ धावा उभारता आल्या.१४२ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अडखळत झाली. आठ षटकांत ४९ धावांत तीन गडी गमविल्यानंतर फरगना हकने अप्रतिम फलंदाजी करीत नाबाद ५२ धावा ठोकल्या. या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. दरम्यान, सलामीवीर शमिमा सुलताना ३३ धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच निगार सुलतानाही १ धाव काढून बाद झाली. यावेळी, भारतीय गोलंदाज अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने फिरवाणार अशीच शक्यता होती. परंतु, बांगलादेशच्या फलंदाजांनी आपल्यावर अतिरिक्त दडपण येऊ न देता खंबीर फटकेबाजी करत भारताच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. फरगनाने रुमाना अहमदच्या साथीने अखेरपर्यंत किल्ला लढवित शेवटच्या षटकात दोन चेंडू रोखून सामना जिंकवून दिला. भारताला गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलभारत महिला : २० षटकात ७ बाद १४१ धावा (हरमनप्रीत कौर ४२, दीप्ती शर्मा ३२; रुमाना अहमद ३/२१, सलमा खातुन १/२१) पराभूत वि. बांगलादेश महिला : १९.४ षटकात ३ बाद १४२ धावा (फरगना हक नाबाद ५२, रुमाना अहमद नाबाद ४२, शमिमा सुलताना ३३; पूनम यादव १/२१, पूजा वस्त्राकार १/२१, राजेश्वरी गायकवाड १/२६).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिला बांगलादेशकडून पराभूत; अतिआत्मविश्वास नडला
भारतीय महिला बांगलादेशकडून पराभूत; अतिआत्मविश्वास नडला
महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन विजयानंतर अतिआत्मविश्वासामुळे पहिल्या पराभवाचे तोंड पहावे लागले. बांगलादेश संघाने भारतावर दोन चेंडू आणि सात गडी राखून अनपेक्षित विजय साजरा केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:59 PM