Join us  

भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यासह मालिका गमावली

गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:58 AM

Open in App

गुवाहाटी : येथे गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले. ११२ धावांचे दिलेले माफक आव्हान इंग्लंडने केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा टी-२० तील हा सलग सहावा पराभव आहे. ११२ धावांचे लक्ष्य पाहुण्या संघाने १९.१ षटकांत पाच बाद ११४ धावा करीत गाठले. सलामीची डॅनियल वॅटने ५५ चेंडूंत सहा चौकारांसह सर्वाधिक नाबाद ६४ धावा ठोकल्या. लॉरेन विनफिल्डने २९ धावांचे योगदान दिले.नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेणाºया इंग्लंडने भारतीय फलंदाजांना चांगलेच कोंडीत पकडले. कॅथरिन ब्रंटने १७ धावांत तीन आणि लिन्से स्मिथ हिने ११ धावा देत दोन गडी बाद केले. ब्रंटने काळजीवाहू कर्णधार स्मृती मानधना १२ आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२) यांना लवकर बाद करीत भारताला बॅकफूटवर आणले. डावखुरी फिरकीपटू स्मिथने हर्लीन देओल(१४)हिला बाद केले. अनुभवी मिताली राजने सर्वाधिक २०, तर दीप्ती शर्मा आणि विदर्भाची भारती फुलमाळी यांनी प्रत्येकी १८-१८ धावा केल्या.इंग्लंडने सावध सुरुवात केली. फिरकीपटू राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद करीत भारताला काहीअंशी यश संपादन करून दिले होते. एकता बिश्तने नताली स्किवर(१)आणि कर्णधार हीथर नाइटला(२)बाद करताच इंग्लंडची स्थिती चार बाद ५६ अशी झाली होती. वॅट-विनफिल्ड यांनी पाचव्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. दीप्तीने विनफिल्डला बाद केले. पण, वॅटने ब्रंटसोबत विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडने पहिला सामना ४१ धावांनी जिंकला होता. (वृत्तसंस्था)>धावफलकभारत महिला : २० षटकांत ८ बाद १११ (मिताली राज २०, फुलमाळी १८, ब्रंट ३/१७, स्मिथ २/११)इंग्लंड महिला : १९.१ षटकांत ५ बाद ११४ डॅनियल वॅट नाबाद ६४, विनफिल्ड २९ बिश्त २/२३ )

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ