नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या पंढरीत ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात पुन्हा एकदा इंग्लिश संघाला चितपट करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे (Smriti Mandhana) उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे तर किरण नवगीरेची टी-२० संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. या दौऱ्याची सुरुवात १० सप्टेंबरला डरहममध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यातून होईल. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील झुलनचा (Jhulan Goswami) शेवटचा सामना असेल.
अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने इंग्लिश संघाचा पराभव केला होता. या विजयाच्या जोरावरच भारतीय संघ फायनलमध्ये पोहचला होता. मात्र संघाला सुवर्ण पटकावण्यात अपयश आले आणि रौप्यवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी टी-२० मालिकेसाठी ऋचा घोषचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर खराब प्रदर्शनामुळे यास्तिका भाटियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र तिने एकदिवसीय संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषक संघातून वगळल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सचेही एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
झुलनच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद
३९ वर्षीय झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकून २५० बळी पटकावले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ती एकमेव अशी गोलंदाज आहे, जिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिक बळी घेतले आहेत. झुलनने एकदिवसी आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार गोलंदाजी करून विक्रम केला आहे. तिने १२ कसोटी सामन्यांमध्ये ४४ बळी घेतले आहेत.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबिनेनी मेघना, तानिया सपना भाटिया, राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादुर, ऋचा घोष, केपी नवगिरे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सब्बीनेनी मेघना, दीप्ती शर्मा, तानिया सपना भाटिया, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादुर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्स.
Web Title: Indian women squad annouced for England tour, Jhulan Goswami to play her farewell match against England at Lord's on 24th September
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.