Join us

भारतीय महिलांचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; जेमिमा, स्मृतीचा अर्धशतकी तडाखा

या शानदार विजयासह भारतीयांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 10:49 IST

Open in App

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतीय महिला संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ४९ धावांनी नमवले. या शानदार विजयासह भारतीयांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या भारताने स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १९५ धावा उभारल्या. यानंतर वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद १४६ धावांवर रोखत भारतीयांनी विजय मिळवला. विंडीजकडून किआना जोसेफ आणि डेंड्रा डॉट्टिन यांनी फटकेबाजी केली. जोसेफने ४९, तर डॉट्टिनने ५२ धावांचा तडाखा दिला. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने दोघींची झुंज व्यर्थ ठरली. टिटास साधूने ३, तर दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. त्याआधी, भारताकडून स्मृतीने ३३ चेंडूंत ५४ तर जेमिमाने ३५ चेंडूंत ७३ धावा केल्या. स्मृती आणि उमा छेत्री (२४) यांनी ५० धावांची सलामी दिली. स्मृतीने जेमिमासोबत ८१ धावा जोडल्या. जीवदान मिळाल्यावर स्मृतीने अर्धशतक झळकावले.

महत्त्वाचे 

स्मृती मानधनाने २८वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावले. स्मृतीने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३.६२२ धावांसह सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये दुसरे स्थान मिळवत कर्णधार हरमनप्रीत कौरला (३५८९) मागे टाकले. न्यूझीलंडची सूझी बेट्स (४५८४) अव्वलस्थानी कायम. जेमिमा रॉड्रिग्जने १२वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावले.

धावफलक 

भारत : २० षटकांत ४ बाद १९५ धावा (जेमिमा रॉड्रिग्ज ७३, स्मृती मानधना ५४, उमा छेत्री २४: करिष्मा रामहारॅक २/१८.) वि. वि. वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १४६ धावा (डेंड्रा डॉट्टिन ५२, किआना जोसेफ ४९; टिटास साधू ३/३७, दीप्ती शर्मा २/२१, राधा यादव २/२८.) 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज