- स्वदेश घाणेकर
भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ एकाच वेळी एकाच देशात मालिका खेळण्यासाठी प्रथमच गेले असतील बहुधा; पण एकाच वेळी पुरुष व महिला संघांनी यजमानांना पराभवाची धूळ चारण्याची ही पहिलीच वेळ नक्की आहे.... विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे आणि त्यांची सातत्यपूर्ण कामगिरीच खूप बोलकी आहे. पण, महिला क्रिकेटच्या बाबतीत तसं नव्हतं... तरीही भारतीय महिलांनी 24 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये मालिका विजयाचा झेंडा फडकावला. आपल्यातील हेवेदावे बाजूला सारून या महिला खेळाडू संघासाठी खेळल्या आणि ऐतिहासिक भरारी घेण्यात यशस्वी झाल्या....
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघात दबून राहिलेल्या नाराजीच्या घुसमटीनं डोकं वर काढलं. खरं तर याची सुरुवात 2017 साली महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच झाली होती. भारतीय महिलांनी अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु अवघ्या 9 धावांनी जेतेपदानं हुलाकवणी दिली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी दिलेला राजीनामा, माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची झालेली निवड, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत मिताली राजला संघाबाहेर करण्याचा प्रसंग, रमेश पोवार यांनी मिताली राजवर केलेली टीका, पोवार यांच्यासाठी हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांची बॅटिंग, अप्रत्यक्षितरित्या मितालीविरोधाचा सूर.... आदी बऱ्याच तणावग्रस्त प्रसंगातून भारतीय महिला संघाला मागील दोन वर्षांत जावं लागलं.
महिला संघाचा हा खडतर प्रवास याआधीही होता, पण त्यावर मात करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यामुळे हे प्रसंग त्यांच्यासाठी नवीन नव्हते. पण, महिला संघाच्या प्रवासात एक खेळाडू खंबीरपणे उभी होती आणि ती आजही आहे. 19 वर्ष 218 दिवस मिताली राज सातत्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि दोनशे वन डे सामने खेळणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. मितालीकडून प्रेरणा घेत भारतातील मुलींनी क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. तीच युवा पिढी आज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांच्या जोरावर भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. दुर्दैवाने या संधींचं सोनं करण्यात त्या अपयशी ठरल्या, परंतु आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाला गांभीर्यानं घेतलं जात आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने सर्व आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्जच्या रूपाने भारताला सलामीला भक्कम पर्याय मिळाला आहे. मधल्या फळीत मोना मेश्राम, मिताली राज, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर ही संयमी; पण खेळपट्टीवर तग धरल्यानंतर तितकीच आक्रमक फटकेबाजी करणारी फळी आहे. दीप्ती शर्मा व शिखा पांडे ही अष्टपैलू जोडी आजच्या घडीला भारताकडे आहे.
गोलंदाजीतही भारतीय महिलांनी परदेशात चांगलाच दबदबा गाजवला आहे. गोलंदाजांच्या युवा फळीचे नेतृत्व अनुभवी झुलन गोस्वामी करत आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड, मानसी जोशी या धडे गिरवत आहेत. पूनम यादव व दीप्ती यांच्या फिरकीसमोर प्रतिस्पर्धी चांगलेच हतबल झालेले अनेकदा पाहायला मिळाले आहे. रोज नव्या आव्हानांचा सामना करून भारतीय महिला संघ पुढे वाटचाल करत आहे. लोखंडाला जेवढं तापवू, तेवढा ते मजबूत होतं.... असेच महिला खेळाडूंसमोर जेवढी आव्हानं उभी करू तेवढ्याच ताकदीनं त्या पुढे जातच राहतील. न्यूझीलंड दौऱ्यातील ऐतिहासिक भरारी हे त्याचे ज्वलंत उदाहरण.
त्यांचं ही भरारी पाहून चक दे इंडियामधलं एक गाणं आठवतं.
बादल पे पांव है, या छूटा गाव है
अब तो भाई चल पडी अपनी यह नाव है...
- 1982 ते 2019 या कालावधीत भारतीय महिलांनी परदेशात 94 सामने खेळले, परंतु त्यापैकी केवळ 39 सामने जिंकता आहे, तर 52 सामन्यांत पराभव पत्करावा लागला
- 2016 ते 2019 या चार वर्षांच्या कालावधीत परदेशातील 18 सामन्यांपैकी भारताने 11 सामन्यातं विजय मिळवला आहे.
- मागील चार वर्षांत भारतीय महिलांनी चार परदेश दौरे केले आणि त्यापैकी तीन मालिका जिंकल्या.
- 2018 मध्ये भारतीय महिलांनी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि 2019 मध्ये न्यूझीलंड अशा तीन मालिकांमध्ये फिनिक्स भरारी घेत विक्रम केला.
Web Title: Indian women team fabulous performance in last four year, credit goes to team effort
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.