चेम्सफोर्ड : सलामीवीर डॅनी वायट हिच्या तडाखेबंद नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडच्या महिला संघाने तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने सलग चौथी मालिका गमावली. याआधी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही इंग्लंडने २-१ असा विजय मिळविला होता. या मालिकेच्या याआधी भारतीय संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिकाही गमावली होती.
सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार अर्धशतकानंतरही भारतीयांना २० षटकांत केवळ ६ बाद १५३ धावांचीच मजल मारता आली. इंग्लंडने १८.४ षटकांतच २ बाद १५४ धावा करत बाजी मारली. वायटने अखेरपर्यंत नाबाद राहताना ५६ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह नाबाद ८९ धावा काढल्या. नॅट स्किव्हरनेही तिला चांगली साथ देत ३६ चेंडूंत ४२ धावा केल्या. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा विजय स्पष्ट केला.
त्याआधी स्मृतीने ५१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची शानदार खेळी केली. सलामीवीर शेफाली वर्मा भोपळाही फोडू न शकल्याचा फटका भारताला बसला. कर्णधार हरमनप्रीत कौरने २६ चेंडूंत ३६ धावा केल्या. अखेरच्या काही षटकांत रिचा घोषने (२०) केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताने दीडशेचा पल्ला पार केला. सोफी एक्लेस्टोन आणि कॅथरिन ब्रंट यांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेत चांगला मारा केला.