दुबई : सलामीच्या लढतीतच न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताला महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपले अभियान पुन्हा मार्गावर आणायचे असेल, तर पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात संघ रचनेतील त्रुटी दूर कराव्या लागतील.
भारताला शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशांना धक्का बसला आहे. भारतीय संघासाठी त्यामुळे पुढील सर्व सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारताची सरासरी धावगती चांगली नाही. त्यासाठी त्यांना आता पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही विभागांत खराब कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध अरुंधती रेड्डी हिच्या रूपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यासाठी भारताला फलंदाजी क्रम बदलावा लागला होता. त्यामुळे हरमनप्रीतला तिसऱ्या, जेमिमा राॅड्रिग्जला चौथ्या आणि रीचा घोषला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागले होते. तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय योग्य ठरला नाही, कारण खेळपट्टीवर ओलावा नसल्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्यांचा सहजपणे सामना केला. भारताला फिरकीपटू राधा यादव हिची उणीव जाणवली.
सामन्याची वेळ : दुपारी ३:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)