माऊंट मोनगानुई : एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धच्या अपराजित मालिका कायम राखताना भारतीय महिलांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. एकतर्फी झालेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०७ धावांनी धुव्वा उडवत भारतीयांनी दिमाखदार विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ५० षटकांत ७ बाद २४४ धावांची समाधानकारक मजल मारली. यानंतर पाकिस्तानला ४३ षटकांत केवळ १३७ धावांमध्ये गुंडाळून भारतीयांनी सहज विजय मिळवला.
महिला क्रिकेटमध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध ११ लढती खेळताना सर्व लढती जिंकल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध ४-० असे वर्चस्व राखले आहे. भारतीयांना मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर पाकिस्तान यावेळी इतिहास रचणार अशी शक्यता होती. मात्र, राजेश्वरी गायकवाड, अनुभवी झूलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांनी नियंत्रित मारा करत पाकिस्तानला वरचढ होऊ दिले नाही. सलामीवीर सिद्रा अमीन हिने ६४ चेंडूंत ३० धावांची खेळी केली. दियाना बैगनेही (२४) थोडीफार झुंज दिली. भारतीयांच्या नियंत्रित माऱ्यापुढे पाकिस्तानला मोकळेपणे खेळण्याची संधीच मिळाली नाही. दडपणात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागल्यामुळे आवश्यक धावगतीही आवाक्याबाहेर गेल्याचे दडपण पाकिस्तानच्या फलंदाजांवर स्पष्ट दिसून आले. राजेश्वरीने ३१ धावांत ४ बळी घेतले. गोस्वामी आणि स्नेह यांनी प्रत्येकी २ बळी घेत राजेश्वरीला चांगली साथ दिली.
त्याआधी, स्मृती मानधना (७५ चेंडूंत ५२ धावा), दीप्ती शर्मा (५७ चेंडूंत ४०), स्नेह राणा (४८ चेंडूंत नाबाद ५३) आणि पूजा वस्त्राकार (५९ चेंडूंत ६७) यांच्या जोरावर भारताने समाधानकारक मजल मारली. मधली फळी कोलमडल्यानंतर स्नेह-पूजा यांनी सातव्या विकेटसाठी १२२ धावांची निर्णायक भागीदारी केली. मोक्याच्या वेळी अर्धशतकी खेळी केलेल्या पूजाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
मितालीचा विश्वविक्रम तब्बल सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा पराक्रम करत ३९ वर्षीय मिताली राजने विश्वविक्रम रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. मितालीने २०००, २००५, २००९, २०१३, २०१७ आणि २०२२ अशा सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मितालीने विश्वचषकामध्ये आतापर्यंत ३२ सामन्यांमधून ५२.१८च्या सरासरीने ११४८ धावा काढल्या असून, यामध्ये २ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. पुरुष क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जावेद मियांदाद आणि भारताच्या सचिन तेंडुलकर यांनी सर्वाधिक ६ विश्वचषक स्पर्धां खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.
संक्षिप्त धावफलकभारत : ५० षटकांत ७ बाद २४४ धावा (पूजा वस्त्राकार ६७, स्नेह राणा नाबाद ५३, स्मृती मानधना ५२; नशरा संधू २/३६, निदा दार २/४५.) वि.वि. पाकिस्तान : ४३ षटकांत सर्वबाद १३७ धावा (सिद्रा अमीन ३०, दियाना बैग २४; राजेश्वरी गायकवाड ४/३१, झूलन गोस्वामी २/२६, स्नेह राणा २/२७.)