क्वालालम्पूर : मागच्या सामन्यात बांगला देशकडून झालेल्या पराभवापासून धडा घेत भारतीय संघाने आशिया चषक महिला टी-२० लढतीत गुरुवारी श्रीलंकेचा सात गड्यांनी पराभव करीत अंतिम फेरीच्या आशा कायम राखल्या.
थायलंड आणि मलेशियाविरुद्ध सहज विजय मिळविल्यानंतर बांगलादेशकडून भारतीय संघ सात गड्यांनी पराभूत झाला. शेजारी देशाविरुद्ध भारतीय महिलांचा हा पहिलाच पराभव होता. मात्र, गुरुवारी दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने विजय संपादन केला. डावखुरी फिरकीपटू एकता बिश्तने दोन गडी बाद केले, शिवाय दोन फलंदाजांना धावबाद केले. अनुजा पाटील आणि पूनम यादव यांनी एकेक गडी बाद केला. लंका संघाची वाटचाली ७ बाद १०७ धावांवर थांबली. भारताने सात चेंडूआधीच तीन बाद ११० धावा करीत सामना जिंकला. मिताली राज २३ आणि स्मृती मानधनाने १२ धावा केल्या. हरमनप्रीतने २५ चेंडूत २४, वेदा कृष्णमूर्तीने २९ आणि अनुजा पाटीलने १९ धावांचे योगदान दिले.
भारत, पाक, बांगलादेश संघांचे प्रत्येकी चार सामन्यात सहा गुण आहेत. अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर कुठल्याही स्थितीत विजय नोंदवावाच लागेल. (वृत्तसंस्था)
मितालीचा विक्रम...
स्टार मिताली राजने टी२० आंतरराष्टÑीय सामन्यात गुरुवारी २००० धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय बनली. मितालीच्या ७५ सामन्यात २०१५ धावा झाल्या आहेत. आंतरराष्टÑीय क्षितिजावर २००० धावा काढणारी मिताली सातवी महिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष कर्णधार विराट कोहलीच्या १९८३, रोहित शर्मा १८५२ व सुरेश रैनाच्या १४९९ धावा आहेत. यानंतर आयसीसीनेही मितालीचे कौतुक केले आहे.
Web Title: Indian women on Vijayapatha; Sri Lanka beat by 7 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.