मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारताने मालिका जिंकत चषक पटकावला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. पण इंग्लंडने हे आव्हान दोन विकेट्स आणि सात चेंडू राखून पूर्ण केले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारताला दुसऱ्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स यावेळी एकही धाव न करता बाद झाली. पण त्यानंतर स्मृती मानधना आणि पुनम राऊत या महाराष्ट्राच्या लेकींनी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने यावेळी आठ चौकार आणि एका षटकारासह 66 धावा केल्या. पुनमने सात चौकारांच्या मदतीने 56 धावा फटकावल्या. भारताच्या अन्य फलंदाजांना या दोघींसारखी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच भारताला 205 धावांवर समाधान मानावे लागले.
भारताच्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची 5 बाद 49 अशी अवस्था होती. पण यानंतर इंग्लंडची कर्णधार हिथर नाईट (47) आणि डॅनियल वॅट (56) यांनी सहाव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली आणि संघाला सावरले. नाइट बाद झाल्यानंतरही वॅटने आपली दमदार फलंदाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. पण वॅट बाद झाल्यावर जी. ए. इल्विसने (नाबाद 33) अखेरपर्यंत किल्ला लढवत इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढती जिंकल्या होत्या. त्यामुळे या सामन्यापूर्वीच भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे या पराभवानंतरही भारताने मालिका जिंकत चषक उंचावला.