मुंबई : अनुभवी झुलन गोस्वामी व शिखा पांडे यांच्या भेदक माऱ्यानंतर सलामीवीर स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडला ७ बळींनी धूळ चारली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाºया इंग्लंडला ४३.३ षटकात १६१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने ४१.१ षटकात ३ बाद १६२ धावा केल्या.
वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदजीचा निर्णय घेतला. झुलनने ३० धावांत ४, तर शिखाने केवळ १८ धावांमध्ये ४ फलंदाज बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीची हवा काढली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताच्या फिरकी माºयापुढे लोटांगण घातले. आता भारताच्या वेगवान माºयापुढे त्यांची दाणादाण उडाली. नताली साइव्हरने १०९ चेंडूत १२ चौकार व एका षटकारासह ८५ धावांची शानदार खेळी केल्याने इंग्लंडला दीडशे धावांची मजल मारता आली.
माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही अडखळत झाली. युवा जेमिमा रॉड्रिग्ज भोपळाही न फोडता माघारी परतली. यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या स्मृती मानधना व मुंबईकर पूनम राऊत यांनी ७३ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. स्मृती-पूनम यांनी कोणताही अतिआक्रमकपणा न करताना शांतपणे भारतीय धावफलक हलता ठेवला. स्मृतीने ७४ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६३ धावा, तर पूनमने ६५ चेंडूत ४ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली.सहज वर्चस्व..जॉर्जिया एल्विस हिने पूनमला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर कर्णधार मिताली राज आणि स्मृती यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत ६६ धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. मितालीने ६९ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी केली. भारताचा विजय २२ धावांनी दूर असताना स्मृती बाद झाली. अन्या श्रुबसोल हिने तिला बाद केले. यानंतर मितालीने दीप्ती शर्मासह (६*) भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.सलग दुसरा विजय मिळवताना भारतीय महिला संघाला आयसीसी महिला चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी फायदा झाला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ महिला एकदिवसीय अजिंक्यपद गुणतालिकेत १६ गुणांसह दुसºया स्थानी पोहचला आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघांना विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.धावफलक :इंग्लंड (महिला) : अॅमी जोन्स झे. एकता गो. शिखा ३, तस्मिन ब्युमोंट झे. दीप्ती गो. शिखा २०, सराह टेलर त्रि. गो. झुलन १, हीथर नाइट झे. जेमिमा गो. झुलन २, नताली साइव्हर पायचीत गो. झुलन ८५, लॉरेन विनफिल्ड झे. स्मृती गो. पूनम यादव २८, जॉर्जिया एल्विस पायचीत गो. शिखा ०, कॅथरिन ब्रंट पायचीत गो. शिखा ०, अन्या श्रुबसोल पायचीत गो. पूनम यादव १, सोफी एक्लेस्टोन त्रि. गो. झुलन ५, अलेक्झांड्रा हार्टली नाबाद ०, अवांतर - १६. एकूण : ४३.३ षटकात सर्वबाद १६१ धावा. बाद क्रम : १-५, २-११, ३-१४, ४-४४, ५-९३, ६-९५, ७-९५, ८-१०८, ९-११९, १०-१६१. गोलंदाजी : झुलन गोस्वामी ८.३-०-३०-४; शिखा पांडे १०-१-१८-४; दीप्ती शर्मा ८-१-३९-०; एकता बिष्ट ८-०-३६-०; पूनम यादव ९-२-२८-२.
भारत (महिला) : जेमिमा रॉड्रिग्ज झे. अॅमी गो. श्रुबसोल ०, स्मृती मानधना पायचीत गो. श्रुबसोल ६३, पूनम राऊत झे. टेलर गो. एल्विस ३२, मिताली राज नाबाद ४७, दीप्ती शर्मा नाबाद ६. अवांतर - १४, एकूण : ४१.१ षटकांत ३ बाद १६२ धावा. बाद क्रम : १-१, २-७४, ३-१४०. गोलंदाजी : कॅथरिन ब्रंट ७-१-२६-०; अन्या श्रुबसोल ८-२-२३-२; जॉर्जिया एल्विस ७.१-१-२८-१; सोफी एक्लेस्टोन ७-०-३१-०; नताली ३-०-११-०; हार्टली ६-०-२९-०; हीथर नाइट ३-०-१०-०.