मेलबर्न : भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० तिरंगी मालिकेतील इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यात फलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याची गरज असेल.ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या सामन्यात मधली फळी अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ चार बळींनी पराभूत झाला. त्याआधी पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर पाच बळींनी मात केली होती. स्मृती मानधना (३५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२८) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकले नव्हते. अखेरचे ६ बळी २१ धावात बाद झाल्याने भारतीय संघ कोलमडला होता. भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य मानली जाणारी शेफाली वर्मा तीन चेंडू खेळून बाद झाली, तर जेमिमा रॉड्रिग्जने ११ चेंडूत केवळ एक धाव केली होती. गोलंदाजांनी हा सामना १९ व्या षटकांपर्यंत खेचला खरा, मात्र विजय मिळविण्यासाठी त्यांच्याकडे धावा शिल्लक नव्हत्या.ऑस्ट्रेलियात २१ फेब्रुवारीपासून सुरू होत अलेल्या टी२० विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात असलेल्या या स्पर्धेत तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन-दोन गुण आहेत.
या सामन्यात बाबत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, " आघाडीची फळी अपयशी ठरल्यास तळाच्या स्थानावरील खेळाडूंना उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मात्र चांगलीच आहे. वेदा कृष्णमूर्ती हिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल."
सामना : भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी ८.४० वाजल्यापासून