Join us  

रमेश पोवार बनले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

भारताचे माजी आॅफस्पिनर रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:42 PM

Open in App

मुंबई : भारताचे माजी आॅफस्पिनर रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. जोपर्यंत तुषार आरोठे यांचा उपयुक्त पर्याय शोधला जात नाही तोपर्यंत रमेश पोवार हे संघासोबत असतील. सीनिअर खेळाडूंसोबतच्या मतभेदानंतर आरोठे यांना राजीनामा देण्यास भाग पडले होते. सीनिअर खेळाडू बडोद्याच्या या माजी अष्टपैलू खेळाडूच्या प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीवर नाराज होते. २५ जुलैपासून भारतीय महिला संघाच्या शिबिरास सुरुवात होणार असून, या शिबिरात पोवार सहभागी होतील. बीसीसीआयने याआधीच पूर्णवेळ प्रशिक्षकासाठी अर्ज मागितले आहेत आणि अर्जासाठी अखेरची तारीख २० जुलै आहे.पोवार म्हणाले, ‘‘माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यावर मी खुश आहे आणि मी महिला संघाच्या प्रगतीसाठी आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेल.’’ ४० वर्षीय पोवारने भारताकडून दोन कसोटी आणि ३१ वनडे सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी वनडे सामन्यांत ३४ गडी बाद केले आहेत. तसेच १४८ प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात ४७० बळी घेतले आहेत. पोवार यांना प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्याची माहिती मंडळाकडून रविवारी मिळाली. गेल्या आठवड्यात पोवार मुंबईच्या वरिष्ठ रणजी संघाच्या शर्यतीत मुंबईचा माजी यष्टिरक्षक फलंदाज विनायक सामंतविरुद्ध मागे पडला होता. या पदासाठी पोवार पहिली पसंती होते; परंतु व्यवस्थापन समितीचा एक प्रस्ताव त्यांच्याविरुद्ध गेला. पोवारने या वर्षी फेब्रुवारीदरम्यान एमसीएच्या क्रिकेट अकॅडमीत फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी ते आॅस्ट्रेलियाला चालले गेले होते.

टॅग्स :क्रिकेट