wisden cricketer of the year list । नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (harmanpreet kaur) इतिहास रचला आहे. तिचा विज्डन क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने (wisden cricketer of the year) सन्मान करण्यात आला असून हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याशिवाय इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला (Ben Stokes) २०२२-२३ मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून पसंती मिळाली आहे. तर महिला खेळाडूंमध्ये हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला मिळाला आहे.
दरम्यान, भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आहे. हरमनप्रीतशिवाय इंग्लंडची वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स, यष्टिरक्षक फलंदाज बेन फोक्ससह न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टॉम ब्लंडेल आणि डॅरिल मिशेल यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये मागील वर्षी एप्रिलनंतर शानदार कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टॉम ब्लंडेलने ३८३ धावा केल्या होत्या. मिशेलने २०२२ मध्ये ६८.३० च्या सरासरीने ६८३ आणि २०२३ मध्ये ४७.५७ च्या सरासरीने ३३३ धावा केल्या आहेत.
हरमनला का मिळाला पुरस्कार?
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरूद्ध वन डे सामन्यात १११ चेंडूत १४३ धावा केल्या होत्या. याशिवाय १९९९ नंतर प्रथमच भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या धरतीवर वन डे मालिका जिंकली होती. हरमनच्या नेतृत्वात भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. शिवाय आशिया चषकाचा देखील किताब पटकावला होता. मागील वर्षी हरमनने १७ वन डे सामन्यात ७५४ धावा केल्या होत्या. यामध्ये १४२ नाबाद ही तिची सर्वोत्तम धावसंख्या राहिली होती.
सूर्यकुमार यादवचाही सन्मान
सूर्यकुमार यादव आताच्या घडीला ट्वेंटी-२० मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने २०२२ या वर्षात २२ ट्वेंटी-२० सामने खेळले असून १८७.४३च्या स्ट्राईक रेटने १,१६४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत. ट्वेंटी-२० मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सूर्याला विज्डन क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur and Suryakumar Yadav have been honored with wisden cricketer of the year awards
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.