गोल्डकोस्ट : बेथ मुनीची ६१ धडाकेबाज खेळी आणि ताहीला मॅक्ग्राथने दिलेल्या ४४ धावांच्या उपयुक्त योगदानामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिला संघावर १४ धावांनी मात केली. या विजयासह भारताविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका आस्ट्रेलियाने २-० ने जिंकली. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात रेणुका सिंगने एलिसा हिलीला बाद करीत संघाचा हा निर्णय सार्थही ठरविला होता. मात्र, त्यानंतर बेथ मुनीने आपला धडाकेबाज खेळ सुरू केला. मुनीने ४३ चेंडूंत १० चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. ताहीला मॅक्ग्राथनेही ३१ चेंडूंत ४४ धावांचे योगदान देत मुनीला मोलाची साथ दिला. या दोघींच्या केलेल्या ४४ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत १४९ धावा काढल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकांत निकोल कॅरीने शेफाली वर्माला लॅनिंगकरवी झेलबाद केले. यानंतर स्मृती मानधना आणि जेमिहा रॉड्रिग्स यांनी ५७ धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. या दोघी खेळत असताना भारत सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, ६० धावा झाल्या असताना जेमिहा बाद झाली आणि भारताची पडझड सुरू झाली. स्मृती मानधनाने एक बाजू लावून ५२ धावांची खेळी केली. मात्र, अन्य खेळाडूंकडून तिला हवी तशी साथ मिळाली नाही. शेवटी रिचा घोषने दोन षट्कार आणि दोन चौकार मारत संघाला विजयासमीप नेण्याच प्रयत्न केला. मात्र, मधल्या फळीच्या हाराकिरीमुळे भारत निर्धारित २० षटकांत केवळ १३५ धावाच करू शकला. आणि या सामन्यासह भारताने ही मालिकाही गमावली.